मुळा-मुठा झाली निर्मळ ‘गंगा’ ! आता तरी कचरा टाकणे बंद करा, प्राणीमित्रांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणू रोखण्यासाठी मागिल तीन महिन्यापासून देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीमध्ये जलपर्णी, थर्माकोल, प्लास्टिक, केमिकल, रसायनमिश्रीत व इतर कुठलाही कचऱ्याचा तवंग नदीतील पाण्यावर दिसत नाही. त्यामुळे मुळा-मुठी नदी निर्मळ गंगा झाली आहे. त्यामुळे मासे आणि जलचर प्राण्यांबरोबर प्राणी पक्ष्यांचा वावर वाढल्याचे दिसत आहे. प्राणी-पक्ष्यी मनसोक्त नदीमध्ये डुंबण्याचा आनंद लुटत असल्याचे चित्र मागिल दोन महिन्यापासून पाहायला मिळत आहे. मुळा-मुठा नाही, तर देशभरातील सर्वच नदीपात्रे स्वच्छ ठेवण्यासाठी संकल्प केला पाहिजे, अशी भावना प्राणीमित्रांनी नागरिकांनी व्यक्त केली.

मांजरी खुर्द येथील अशोक आव्हाळे म्हणाले की, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक आणि कवडीपाट दरम्यान नदीतील पाणी स्चव्छ झाले आहे. यापुढेसुद्धा पुणे शहरासह नदीकाठच्या सर्वच नागरिकांनी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण मागिल दोन महिन्यापासून नदीमध्ये प्लास्टिक, थर्माकोल, घनकचरा, हॉटेलमधील शिल्लक अन्नधान्य टाकला जात नसल्याने नदी स्चव्छ झाली आहे. देशभरातील सर्वच नद्यांचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असा संकल्प केला पाहिजे.

लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, कंपन्या, दुकाने, हॉटेल्स, ढाबे, फेरीवाले आदी सर्व व्यवहार ठप्प आहेत. घनकचरा कमी झाला, नदी, खडकवासला धरणातून इंदापूर-दौंडसाठी जाणाऱ्या कालवा, ओढे, नाल्यामध्येही यावर्षी कचरा साचल्याच्या तक्रारी आल्या नाहीत. नदी आणि कालव्यामध्ये जलपर्णीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी नदीकाठच्या नागरिकांना डास-मच्छरांचा त्रास कमी झाल्याचे बोलले जात आहे. प्लास्टिक, थर्माकोल, हॉटेलमध्ये शिल्लक राहणारे खाद्यपदार्थ असा अनेकविध प्रकारचा कचरा नदीमध्ये रात्री-अपरात्री टाकला गेला नाही. त्यामुळे नदी स्वच्छ राहण्यासाठी एकप्रकारे मदतच झाली आहे, असे मांजरी खुर्द आणि बुद्रुक येथील नागरिकांनी सांगितले.

पाण्यात खालुन उकळी फुटल्यासारखे दुर्गंधीयुक्त बुडबुडे दिसत होते, तेसुद्धा यावर्षी गायब झाले आहेत. यामुळे मच्छरचेप्रमाणही कमी झाल्याचे नागरिक सांगत आहेत. नदीमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाणी स्वच्छ झाले, त्याचा परिणाम जलचर प्राणी, मासे यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. कवडीपाट येथे पक्ष्यी निरीक्षकांना पक्षी निरीक्षणाची चांगली संधी आहे. नदीतील पाण्यावर शेतकऱ्यांनी शेती फुलविली आहे. दरवर्षी नदीला गटारगंगा म्हटले जात होते. मात्र, यावर्षी मुळा-मुठा नदी आज तरी निर्मळगंगा म्हटले जात आहे.

हवेली-दौंड तालुक्याला वरदान ठरलेली मुळा-मुठा नदी बाराही महिने वाहत असते. तिच्यामुळे दोन्ही तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना दुष्काळाची पुसटशीसुद्धा जणीव होत नाही. शेतीला पाणी कमी पडत नाही. त्यामुळे मुळा-मुठा ही आमची गंगामाईच आहे असे येथील शेतकरी सांगत आहेत.

पावसाळ्यामध्ये पावसाचा जोर वाढली की, दुथडी भरून वाहते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये निसर्गप्रेमी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचे अनोखे चित्र टिपण्यासाठी गर्दी करतात. मात्र, यावर्षी उन्हाळ्यामध्येसुद्धा अनेकांनी पक्ष्यी-प्राणी नदीमध्ये डुंबतानाचे चित्र टिपून संग्रही ठेवले आहे, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.