प्रवाशी संख्या घटल्याने इंद्रायणी एक्सप्रेसनंतर डेक्कन क्वीनही रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटामध्ये सध्या मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक नियमावली अंमलात आणली जात आहे. ऐन उन्हाळ्यात अनेकांना कोरोनामुळे घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे रोडावलेल्या प्रवाशी संख्येमुळे अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात मागील वर्षी मार्चमध्ये रेल्वेच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रुग्णसंख्या घटल्यानंतर रेल्वेने आपली सेवा पुन्हा सुरु केली. मात्र, 2021 च्या सुरुवातीपासून देशात आणि महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली. पुणे आणि मुंबईत रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वेकडे पाठ फिरवली.

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने आपल्या काही गाड्या रद्द केल्याचे जाहीर केले होते. त्यामध्ये मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार 14 मे पासून डेक्कन क्वीन देखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना या मार्गावरुन जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या इतर रेल्वे गाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. इंद्रायणी एक्सप्रेस जून अखेरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर डेक्कन क्वीन पुढील आदेश येईपर्यंत 14 मे पासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

डेक्कन क्वीनसह कोल्हापूर-मुंबई ही गाडी देखील 18 मे पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी प्रवाशांची मागणी नसल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, कोल्हापूर-नागपूर, दादर-पंढरपूर, दादर-शिर्डी, मुंबई-गदग, मुंबई-बिदर, मुंबई-लातूर, मुंबई-कोल्हापूर, पुण्याहून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सोडण्यात येणारी पुणे-अहमदाबाद एक्सप्रेस, पुणे-फलटण, लोणंद-फलटण या मार्गावरील डेमू रेल्वेचा समावेश आहे. पुणे-मुंबई प्रवासासाठी स्वतंत्र गाड्या नसल्याने प्रवाशांना दक्षिणेकडून पुणेमार्गे मुंबई किंवा गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांनी प्रवास करावा लागणार आहे.