Pune : अतिवृष्टीच्या शक्यतेने महापालिकेची यंत्रणा ‘अलर्ट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या साथीमध्ये आलेल्या पावसाळ्यामध्ये महापालिकेला आतापर्यंत फारशा मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले नाही. परंतू मागील सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विशेषत २५ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने दोन दिवसांपुर्वी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेत अत्यावश्यक यंत्रणा ‘अलर्ट’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांच्या अध्यक्षतेखाली २३ सप्टेंबरला झालेल्या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हवामान खात्याने अतिवृष्टीचा दिलेला इशारा आणि मागील वर्षी सप्टेंबरमध्ये विशेषत: २५ सप्टेंबरला रात्रीच्यावेळी झालेल्या ढगफुटीनंतर आंबिल ओढ्यासह अनेक ओढे, नाल्यांच्या पूरस्थितीमुळे झालेली मनुष्य व वित्तहानी डोळ्यासमोर ठेवून सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत.

शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे पुर्ण भरली आहेत. अतिवृष्टी झाल्यास धरणातून विसर्ग सुरू केल्यास तसेच शहरात ढगफुटीसारखी घटना घडल्यास अग्निशामक दलाला सज्ज राहाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वच परिमंडळातील उपायुक्तांना नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी शाळांमध्ये व्यवस्था उपलब्ध करून देण्यापासून विस्थापितांची देखभाल करण्याबाबत तयारीचे आदेश दिले आहेत.

यासाठी यंत्रणेची सज्जता करण्यासही सांगितले आहे. पाणी साठणे, तळघरांमध्ये पाणी शिरणे, ओढे नाल्यांना पूर येउन सोसायटया, रस्ते जलमय झाल्यास अगदी वाहतूक बदल करण्यापासून नागरिकांच्या जिवितेचे आणि मालमत्तेचे नुकसान होणार नाही यासाठी क्षेत्रिय पातळीवर तयारी ठेवावी. महापालिकेची क्षेत्रिय कार्यालयातील नियंत्रण कक्ष चोवीस तास अलर्ट ठेवण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत.