Lockdown Again In Pune : पुणे मनपाकडून 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू होणार्‍या लॉकडाऊनची नियमावली जाहीर, जाणून घ्या काय बंद अन् काय चालू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे शहरातील रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. 13 जुलैच्या (मंगळवार) पहाटे 1 वाजल्यापासून ते 23 जुलैच्या रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान संपुर्ण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासंदर्भात मनपाकडून नियमावली जाहीर करण्यात आली असुन ती पुढील प्रमाणे आहे.

1. सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेत, सर्वइतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने दि. 14 ते 18 जुलै दरम्यान संपुर्णतः बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेत यांची दुकाने सुरू राहणार आहेत. इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहणार आहेत.


2. झोमॅटो, स्विगी व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरून मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा 14 जुलैच्या पहाटे 1 वाजल्यापासून ते 23 जुलैच्या रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान बंद राहणार आहे.

3. सार्वजनिक / खासगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उद्याने, बगीचे हे संपुर्णतः बंद राहणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक प्रतिबंधीत राहील.


4. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (वंदे भारत योजनेअंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले वगळुन), रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपुर्णतः बंद राहणार आहेत.

5. सर्वकेश कर्तनालय / सलुन / स्पा / ब्युटी पार्लर दुकाने पुर्णतः बंद राहणार आहेत.

6. सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा / आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते / आठवडी व दैनिक बाजार /फेरीवाले हे सर्वठिकाणी 14 जुलै ते 18 जुलै दरम्यान पुर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै दरम्यान केवळ सर्व अत्यावश्यक किरकोळ व ठोक विक्रीचे मोंढा / आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते, दैनिक भाजी बाजार या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यानच चालु राहतील.

7. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री 14 जुलै ते 18 जुलै दरम्यान पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यानंतर 19 ते 23 जुलै दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान चालु राहील.

8. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्वप्रकारचे शिकवणी वर्ग संपुर्णतः बंद राहतील.

9. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने-दोन चाकी, तीन चाकी व चार चाकही पुर्णपणे बंद राहतील. तथापि, अत्यावश्यक सेवेतील वाहने, पुर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे-येणे करिता व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खासगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील.

10. शहरातील सार्वजनिक व खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादीसाठी संपुर्णतः बंद राहतील. तथापि, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पुणे मनाचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागांचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.

11. सर्व प्रकारचे बांधकाम / कंस्ट्रक्शनची कामे पुर्णपणे बंद राहतील. तसेच ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरू ठेवता येईल.

12. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह पुर्णपणे बंद राहणार आहेत.

13. सर्व प्रकारचे मंगल कार्यालये, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ, पुर्णपणे बंद राहतील. मात्र, यापुर्वी परवानगी घेतलेले लग्न समारंभ 20 पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये आयोजित करता येतील.

14. सर्व प्रकारच्या खासगी आस्थापना कार्यालय संपुर्णतः बंद राहतील.

15. सामाजिक / राजकीय / क्रिडा / मनोरंजन / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम व सभा संपुर्णतः बंद राहतील.

16. धार्मिक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील.

17. पुणे शहरातील सर्व खासगी कार्यालये बंद राहतील.

18. ई-कॉमर्स सेवा उदा. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट व तत्सम सेवा 14 जुलै ते 18 जुलै दरम्यान पुर्णपणे बंद राहतील. त्यानंतर 19 जुलैपासून चालु राहतील.

खालील अत्यावश्यक बाबी / सेवा मर्यादित स्वरूपात व निर्बंधासह सुरू राहतील.

1. दुध विक्री व दुधाचे घरपोच वितरण संपूर्ण कालावधीत अनुज्ञेय राहील.

2. सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरू राहतील.

3. सर्व रूग्णालये व रूग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरू राहतील व कोणतेही रूग्णालय लॉकडाऊनचा आधार घेवुन रूग्णांना आवश्यक सेवा नकारणार नाही. अन्यथा संबंधित रूग्णसेवा संस्था कारवाईस पात्र राहील.

4. सर्व मेडीकल दुकाने तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा संपुर्ण कालावधी करिता सुरू राहतील.

5. सर्व मा. न्यायालये व राज्य शासनाचे / केंद्र शासनाचे कार्यालये तसेच शासन अंगिकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र 4. नुसार दि. 29 जून 2020 चे आदेशानुसार 10 टक्के कर्मचारी वर्गासह सुरू राहतील. शक्यत असल्यास वर्क फ्रॉम होम चा पर्याय वापरण्यात यावा. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचार्‍यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही. तथापि संबंधित शासकीय कर्मचार्‍याने स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.

6. पेट्रोलपंत व गॅसपंप सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील व ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा करतील.

7. एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील.

8. औद्योगीत व इतर वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, अंतरजिल्हा, अंतरराज्य वाहतुक शासकीय नियमानुसार सुरू राहील.

9. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल / पिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरू राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 6 ते 9 या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील.

10. पाणीपुरवठा करणारे टँकरला नियमानुसार परवानगी राहील.

11 संस्थात्मक अलगिकरण / विलगीकरण व कोविड केअर सेंटर करता महापालिकेने ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमानुसार सुरू राहतील.

12. सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरू राहतील. बँकेच्या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन एटीएम सेवा सुरू राहतील.

13. संपुर्ण पुणे शहराचे हद्दीतील मा. न्यायालयाचे कर्मचारी, अधिकारी, मा. न्यायाधीश, वकील, शासकीय राज्य / केंद्र शासनाचे कर्मचारी, शासन अंगिकृत कर्मचारी, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संंबंधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्यावश्यक सेवा जसे कृषी, बी-बियाणे, खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खासगी कामगार, अग्नीशमन सेवा, जलनिःसारण तसेच पुर्वपावसाळी व पावसाळयादरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे, वीज वहन व तिरण कंपनीचे कर्मचारी, मनपाचे कर्मचारी, पोलिस विभागाचे कर्मचारी, महसुल विभागाचे कर्मचारी तसेच कंन्टेमेंट झोन करिता नियुक्त कर्मचारी यांनाच चारचाकी, दुचाकी (स्वत/करिता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील. या सर्व कर्मचारी /अधिकारी यांनी स्वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे व वाहनाचे आवश्यक परवाने सोबत ठेवावे. या सर्वांना वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांचे कामचे जबाबदारी नुसार व शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.

14. औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्यो गव त्यांचे पुरवठादार नियमानुसार चालु राहतील व यासाठी एमआयडीसी पोर्टल वरून यापुर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राहय धरण्यात येतील. अद्याप परवानगी न घेतलेल्या उद्योगांनी एमआयडीसी पोर्टलवरून परवानगी प्राप्त करावी.

15. पुणे मनपा क्षेत्रामध्ये सुरू असलेले स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प, मेट्रो, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महत्वाचे प्रकल्प इ. यांचे काम पुणे मनपाकडे ई-मेलवर अर्ज करून पुर्व परवानगीसह सुरू ठेवता येईल.

16. पुणे शहरातुन परवाना असलेल्या उद्योगांना उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी आणि परतीसाठी परवानगी राहील. मात्र कर्मचार्‍यांनी त्यांची ओळखपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे तसेच बंधनकारक आहे. तथापि ज्या औद्योगिक आस्थापनामध्ये कोविड-19 चा रूग्ण आढळून येईल त्यामधील सर्व कामगारांची कोविड-19 ची तपासणी स्वखर्चाने करणे बंधनकारक आहे. दरम्यानच्या कालावधीत उद्योग बंद ठेवण्यात यावा. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तीसच फक्त कामावर उपस्थित राहता येईल.

17. पुणे शहरातील एमआयडीसी किंवा खासगी जागेवरील उद्योग चालु राहणार असल्यामुळे त्यांना आवश्यक ते पास पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर अर्ज करून पुर्व परवानगीसह कामगारांची वाहतुक निश्चित बसने करता येईल.

18. माहिती तंत्रज्ञान उद्योग (आयटी क्षेत्र) 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरू ठेवता येतील, शक्य असल्यास वर्क फ्रॉर्म होम चा पर्याय वापरण्यात यावा.

19. शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालु राहतील.

20. सर्व वैद्यकीय ववसायिक, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व रूग्णवाहिका (अ‍ॅम्बुलन्स) यांना शहराअंतर्गत वाहतूकीसाठी परवानगी राहील.

21. वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरू राहतील.

22. जीवनावश्यक वस्तूंचे, औषधांचे घरपोच वाटप सकाळी 8 ते रात्री 10 या कालावधीतच पोलिस आयुक्त कार्यालयाच्या पुर्व मान्यतेने पास घेवुन अनुज्ञेय राहील. सदर सुविधेकरिता फक्त पोलिस आयुक्त कार्यालयाव्दारे निर्गमीत करण्यात आलेला पास ग्राहय धरण्यात येईल.

महत्वाचे – पुणे मनपा क्षेत्रातील 65 वर्षावरील व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, एचआयव्ही बाधित रूग्ण, इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्षे 10 पेक्षत्त कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिचवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. या शिवाय इतर कोणतीही व्यक्ती पायी अथवा सायकलवर अथवा चारचाकी अथवा दुचाकी वाहन घेवुन घराबाहेर फिरणार नाही. असे इतर कोणतीही व्यक्ती वाहने घेवुन विनाकारण फिरत असल्यास त्याचे चारचाकी / दुचाकी वाहन जप्त करणत येईल. त्याचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल. व त्याच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतूदीनुसार व तत्सम इतर कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदर करण्यात येईल.

टीप – सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अंकित कार्यरत असलेल्या कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केल्याची खात्री करून घ्यावी. वरील सर्व आदेशाचे पालन न करणार्‍याविरूध्द कोणतीही व्यक्ती, संस्था, भादंवि कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 याची कलमे 51 ते 60 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यास पात्र असतील.