Pune : कामगार पुतळा, राजीव गांधी वसाहत आणि जुना तोफखाना झोपडपट्टीतील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी महापालिकेकडून 10 अधिकार्‍यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मेट्रो जंक्शनच्या कामासाठी शिवाजीनगर येथील जुना तोफखाना, कामगार पुतळा झोपडपट्टी आणि राजीव गांधी वसाहतीतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. येथील झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण आणि कागदपत्रांच्या तपासणीसोबतच अंतिम यादीचे काम करण्यासाठी महापालिकेने १० अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा न्यायालयालगत असलेल्या राजीव गांधी वसाहत, जुना तोफखाना आणि कामगार पुतळा झोपडपट्टीच्या जागेवर मेट्रो जंक्शनचे नियोजन आहे. कृषी महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम झाले आहे. पुढील टप्प्यात कामगार पुतळा परिसरातील झोपडपट्टीच्या भागामध्ये जंक्शन व पुढील भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या जागेवर असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांचे एसआरए कार्यालयामार्फत यापुर्वीच सर्वेक्षण झालेले आहे. यानंतर एसआरएने ज्या नागरिकांनी झोपडीवरील मालकीहक्काचे पुरावे देखिल मागितले होते. मात्र, याला नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. नुकतेच एसआरएने महापालिकेच्या माध्यमातून अखेरची नोटीस बजावली असून २७ ऑक्टोबर पयर्र्त उर्वरीत नागरिकांनी मालकीहक्काचे पुरावे द्यावेत, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, २७ ऑक्टोबरनंतर प्रत्यक्षात येथील झोपडीधारकांचे स्थलांतर आणि पुनर्वसन करण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे. तत्पुर्वी महापालिकेच्यावतीने पुन्हा एकदा येथील झोपडपट्टयांचे सर्वेक्षण केले जाणार आहेत. बाधित होणार्‍या नागरिकांकडून कागदपत्र जमा करून पडताळणी केली जाणार आहे. यानंतर प्रकल्पात बाधित होणार्‍यांची अंतिम पात्रता यादी तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी परिमंडळ क्र. २ चे उपायुक्त नितीन उदास यांच्या नेतृत्वाखाली दहा अधिकारी व कर्मचार्‍यांची अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी नियुक्ती केली आहे.

स्थलांतरणाबाबत नागरिकांशी काहीच चर्चा न करता महापालिकेने थेट नोटीसेस पाठविल्याने संतप्त झालेल्या स्थानीक नागरिकांनी दोन दिवसांपुर्वी महामेट्रोच्या कार्यालयात टाळेठोको आंदोलन केले होते. शुक्रवारी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन देउन स्थलांतरणास विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर पवार यांनी नागरिकांसोबत चर्चा करूनच यातून मार्ग काढावा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.