भाजीपाला-फळे विक्रेत्यांसाठी पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भाजीपाला-फळे विक्रेत्यांना रस्त्यावर विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील भाजी मंडई बंद असल्याने विक्रेते रस्त्याच्या कडेला भाजी-फळे विक्री करत आहेत.रस्त्यावर ठिकठिकाणी भाजी आणि फळे विकणाऱ्यांवर पुणे महापालिकेने बंदी घातली असून आजपासून अशा विक्रेत्यांवर तसेच वाहनांवर महापालिका कडक कारवाई करणार आहे.

शहरातील विविध मंडई बंद असल्याने या काळात अनेकांनी रस्त्यावर भाजीपाला आणि फळे विक्री सुरु केली होती. घराजवळ भाजी मिळत असल्याने महापालिकेनेही अशा विक्रीवर कोणतीही बंधने घातली नव्हती. मात्र शहरात 5 जून पासून महापालिकेच्या सर्व मंडई व गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार आवारातील भाजी मार्केट व खासगी दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला व फळे मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

शहरातील विविध मंडई सुरु
शहरातील विविध मंडई सुरु झाल्या असल्या तरी भाजपाली-फळे विक्रते रस्त्यांवर ठिकठिकाणी लॉकडाऊनच्या काळात विक्री करण्यासाठी बसलेले होते ते आजही या ठिकाणी आहेत. त्यांच्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून कोरोना सुरक्षेबाबत घातलेले नियमही पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुरुवार (दि.9) पासून रस्त्यांवर भाजीपाला घेऊन बसणाऱ्या अनधिकृत किरकोळ विक्रेत्यांवर तसेच त्यांच्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.

अतिक्रमण पथकांकडून होणार कारवाई
महापालिकेचे रस्ते, पदपथांवर अनधिकृतपणे शेतीमालाची विक्री करण्यात येऊ नये, अशी विक्री करताना आढळून आल्यास अशा वाहनांवर, शेतीमालावर सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत वाहने व शेतीमाल जप्त केला जाणार आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात आज नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अशी होणार दंड वसुली
या कारवाईमध्ये वाहन चालकांकडून दंड वसूल केला जाणार आहे. त्यात दहा टनापर्यंत वाहतूक क्षमता असलेल्या हलक्या वाहनांकडून 20 हजार रुपये, कार-जीप आदी वाहनांकडून 15 हजार रुपये आणि तीन चाकी टेम्पो चालकाकडून 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे आज पासून रस्त्यांवर होणारी भाजीपाला आणि फळे विक्री करता येणार नाही.