Pune : महापालिकेकडून 24 कोविड केअर सेंटर्स व विशेष कक्ष केले बंद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी सुरू केलेले २४ कोविड केअर सेंटर व विविध कक्ष बंद केले आहेत. याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनाही मूळ ठिकाणी रुजू होण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत महापालिकेच्या विविध कामांना गती मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यामध्ये मार्चमध्ये कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर हा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या. अगदी लॉकडाउनच्या काळात कामगारांच्या निवारा व्यवस्थापनापासून कोव्हीड सेंटर, क्वारंटाईन सेंटरसह अन्य कामांसाठी विविध कक्ष उभारण्यात आले होते. यासोबतच कंटेन्मेंट झोन तयार करणे, स्वाब सेंटर यासाठी महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती मोठ्याप्रमाणावर करण्यात आली होती. याचा विविध विभागांतील कामकामकाजावर परिणाम झाला होता. दरम्यानच्या कालावधीत रुग्णसंख्या वाढत असतानाच गंभीर रुग्णांसाठी कोव्हीड हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आयसीएमआरच्या गाईडलाईन्स नुसार कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईनची सुविधा असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही संस्थांनी व लोकप्रतिनिधींनी पुढे येत विलगीकरण कक्षही सुरू केले आहेत.

लॉकडाउन संपल्यानंतर विस्थापीत कामगारांसाठीचे कक्ष बंद करण्यात आले आहेत. तसेच होम क्वारंटाईन सुरू झाल्यानंतर कोव्हीड सेंटरही बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत असे तब्बल २४ कोव्हीड सेंटर आणि विविध कक्ष बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या मूळ विभागात रूजू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या वाढणार असून त्या विभागांच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.