Coronavirus Lockdown : आर्थिक वर्ष उद्या संपणार ! केलेल्या कामांची पालिकेच्या ठेकेदारांना ‘चिंता’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर महापालिकेची सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. तर दुसरीकडे उद्या 31 मार्चला आर्थिक वर्ष संपत असताना प्रशासनाने मुदतवाढीसाठी कूठलीच पावले उचलली नसल्याने ठेकेदारांपुढील अडचणी वाढल्या आहेत.शहरात 9 मार्चला कोरोनाची लागण झाल्याचे रुग्ण आढळल्यानंतर अगोदर पासूनच तयारीत असलेले पालिका प्रशासन अधिकच अलर्ट झाले. कुठल्याही अन्य कामांपेक्षा कोरोनावर फोकस करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, यावर्षी दोन निवडणुका आणि लांबलेला पाऊस यामुळे कामांना विलंब झाल्याने मार्च च्या पहिल्या आठवड्या पर्यंत निविदाना मुदतवाढ देण्यात आली. विशेषतः क्षेत्रीय कार्यालय व उपायुक्त कार्यालय पातळीवर 25 लाख रुपयां पर्यंतच्या कामांच्या शेकडो निविदा काढण्यात आल्या आहेत. अशातच 18 – 19 तारखेनंतर जमावबंदी व पाठोपाठ संचारबंदी लागू झाल्याने गर्दी टाळण्यासाठी कामे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तर अनेक ठिकाणी कामगारांनी आपल्या मूळ गावी जाणे सुरू केले.

शासनाच्या आदेशामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थितीही टप्याटप्याने कमी करत पाच टक्क्यांवर आणून ठेवण्यात आली. त्यातही आरोग्य व पाणी पुरवठा विभागाला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे मागील दीड दोन महिन्यात केलेल्या कामांचे बिलिंग करण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच उद्या 31 मार्चला आर्थिक वर्ष संपत आहे. बिल घेण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दरवर्षी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. परंतु लॉक डाउन मुळे कामांची मोजमापे झालेली नाहीत. तसेच ज्याची झाली आहेत, त्यांचे बिलिंग करणे, तपासणे यासाठी पुरेसा स्टाफ उपलब्ध नाही. अनेक ठेकेदार प्रसंगी बँकांकडून कर्ज काढून कामे करत असतात. संचारबंदीमुळे रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांचे हप्ते भरण्यास सवलत दिली आहे, ही या ठेकेदारांसाठी दिलासादायक बाब आहे. परंतु 31 मार्चपूर्वी बिल न मिळाल्यास तांत्रिक कारणास्तव ती अधिक काळ रखडू शकतात, ही भिती त्यांना सतावत असल्याचे काही ठेकेदारांनी सांगितले.