पुण्यात परदेशातून येणाऱ्या दोन ते अडीच हजार प्रवाशांच्या राहण्यासाठी पुणे महापालिकेकडून वास्तूंचा शोध

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर परदेशातून विशेषतः ज्या देशात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे तेथून येणाऱ्या प्रवाशांना साधारण दोन आठवडे स्वतंत्रपणे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरात साधारण दोन ते अडीच हजार प्रवाशांना स्वतंत्रपणे ठेवण्यासाठी वास्तूंचा युद्धपातळीवर शोध सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

साधारण दोन महिन्यांपूर्वी चीन येथील वुहान शहरात कोरोना या संसर्गजन्यवुहान रोगाचे रुग्ण सापडले. हा हा म्हणता या संसर्गजन्य रोगाने अवघे जग व्यापल्याने खळबळ उडाली आहे. भारतातही इटली, इराण व अन्य देशातून आलेल्या प्रवाशांना या कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्याने केंद्र आणि राज्य सरकारने सतर्कतेचे आदेश दिले असून या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत असून आरोग्य यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.

नुकतेच राज्य सरकारनेही या विषाणूजन्य रोगाची व्याप्ती पाहता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची विमानतळावर तपासणी करण्यात येत असून संशयितांवर रुग्णालयात उपचारही करण्यात येत आहेत. यापुढे जाऊन परदेशातून विशेषतः चीन, इटली, इराण, जपान व कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झालेल्या देशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला किमान दोन आठवडे आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे.

सरकारकडून सूचना मिळाल्या नंतर पुणे महापालिकेने मोठ्या प्रमाणावर निवासी गाळे, विशेषतः ज्याठिकाणी सर्व सुविधा असतील याचा युद्ध स्तरावर शोध सुरू केला आहे. महापालिकेचा मालमत्ता व्यवस्थापन विभाग यासाठी कामाला लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. विशेष असे की याच कारणास्तव महापालिकेने सर्व रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश दिले असून पालिकेच्या रुग्णालयात यापुढील काळात खाजगी संस्थांच्या सोबत संयुक्त प्रकल्पही थांबवण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले.