‘सफाई’च्या कामांना आळा अन् उत्पन्न वाढीचे ‘आव्हान’ स्वीकारलेले स्थायी समितीचे 7390 कोटीचे अंदाजपत्रक ‘सादर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘सफाई’ च्या कामांना आळा घालतानाच मध्यवर्ती भागातील रिंगरोडवर दिवसभर अवघ्या 10 रुपयांत बस प्रवास, सारसबागेची नवनिर्मिती, शिवाजी रस्त्यावर ‘ग्रेड सेपरेटर’, समाविष्ट गावांमध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ अशा नवनवीन संकल्पना. तर उत्पन्न वाढीसाठी 34 गावातील रस्ता रुंदीकरण, बांधकाम परवानगी शुल्काची तीन टप्प्यात आकारणी, 200 ठिकाणी स्वयंचलित जिन्याचे पादचारी पुल उभारून त्यावर जाहिरातीचे हक्क देऊन उत्पन्न वाढ सुचवणारे 7 हजार 390 कोटी रुपयांचे 2020 – 21 यावर्षीसाठीचे अंदाजपत्रक आज स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज सर्वसाधारण सभेत सादर केले.

महापालिका आयुक्तांनी मिळकतकरातील 150 कोटी रुपयांच्या दरवाढीसह सादर केलेल्या 6 हजार 229 कोटी रुपयांच्या अंदाज पत्रकातील मिळकतकर दरवाढ रद्द करून स्थायी समितीने सादर केलेले अंदाजपत्रक 1161 कोटी रुपयांनी फुगविले आहे. विशेष असे की या अंदाजपत्रकातील योजना पूर्णत्वास नेणे आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सादर केलेल्या योजनांवर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने हेमंत रासने यांच्याकडेच राहाणार असल्याने त्यांचा ‘कस’ लागणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020 – 21 या वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर करतानाच या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याची संधी अपल्यालाच मिळणार असल्याने उधळपट्टीला लगाम लावतानाच अपेक्षित उत्पन्नाचा टप्पा गाठण्यासाठी विशेष योजना मांडल्या आहेत. त्यासोबतच मध्यवर्ती शहर केंद्रबिंदू मानून नाविण्यापूर्ण योजना मांडताना शहराच्या विविध भागांतील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.

खर्चात बचत हीच उत्पन्न वाढ हे सूत्र लक्षात ठेवत नालेसफाई व ड्रेनेज सफाई च्या कामांना काहीअंशी लगाम लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत असले तरी त्याची कसर नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, चेंबर्स बदलणे आणि काँक्रिटीकनाच्या कामातून भरून काढत, वरकरणी उधळपट्टीला चाप लावल्याचे चित्र निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे.

दृष्टिक्षेपात अंदाजपत्रक सन २०२०-२०२१

महसुल वाढीसाठी महत्वपुर्ण योजना

मिळकतकरातील गळती थांबविणे आणि सुमारे ४२०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी अभ्यासपूर्ण योजना आखून अंमलबजावणी करणे. संपुर्ण शहरातील ६ मीटर रस्त्यांवर टीडीआर वापरायला परवानगी नाही. स्थायी समितीच्या अखत्यारित २१० आखणी करून ते रस्ते रूंद करणार आणि पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देऊन निधी उभा करणे.

बांधकाम परवाना प्रक्रियेतील शुल्काची रक्कम एकत्रित न आकारता तीन टप्प्यात शुल्क आकारणी करून बांधकाम प्रकल्पांना गती देणार. मालमत्ता व्यवस्थापन विभागाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेत धोरण आणून त्या अनुषंगाने उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार. शहरात किमान २०० ठिकाणी पादचारी उन्नत मार्ग (गँट्री) विकसित करून (लिफ्ट किंवा सरकते जिने) आकाशचिन्ह विभागाच्या माध्यमातून जाहिरातीचे हक्क देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार शहरातील महापालिकेची उद्याने, उड्डाण पूल, नदीवरील पूलावर जाहिरातीचे हक्क देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार.

महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिका आणि अन्य वास्तूंकडून भाड्याच्या रकमेच्या वसुलीच प्राधान्य. मोबाईल कंपन्यांच्या थकबाकीची वसुली. महसूल संदर्भातील न्यायप्रविष्ट दाव्यांवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची लवाद म्हणून नियुक्ती करून दावे लवकरात लवकर निकाली काढून थकित महसूलची प्रभावी वसुली करणार.

गतिमान वाहतूक रिंग रोड, नवे रस्ते रस्त्याची कामे करताना सर्वप्रथम त्या रस्त्यावरील पाईपलाईन व अन्य सेवा वाहिन्यांची कामे करण्यात येतील. त्यानंतरच रस्ते व अर्बन स्ट्रीट गाईडलाईननुसार पदपद आणि वाहतुक नियमांप्रमाणे आवश्यक स्ट्रीट फर्निचर करण्यात येईल. याची जबाबदारी क्षेत्रिय कार्यालयाच्या अधिकार्‍यांवर निश्‍चित करण्यात येणार आहे.

लालमहाल चौक ते फडगेट पोलीस चौकी ग्रेडसेपरेटर
शिवाजी रस्त्यावरील लालमहाल चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी लालमहाल चौक ते फडगेट पोलीस चौकी ग्रेड येथे सेपरेटर प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

बंडगार्डन जंक्शन ते मुंढवा पूल डीपी रस्ता
पुणे-नगर रस्ता व नॉर्थ मेन रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बंडगार्डन जंक्शन ते मुंढवा पूलापर्यंत सुमारे ३ किलोमीटर लांबीचा रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. पी. पी. पी. किंवा क्रेडिट नोटमाध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. याच धर्तीवर शहरातील २१ रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे.

साधु वासवानी पूल ते बंडगार्डन पूलाचा पुनर्विकास
साधु वासवानी पूल ते बंडगार्डन दरम्यानचा ९ मी. रुंदीचा उड्डाणपुल वाहतुकीसाठी अपुरा असून तो धोकादायकही झाला आहे. तो नव्याने उभारण्याचे नियोजन आहे.

उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभिकरण
पुणे शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे काढून टाकून या जागा बंदीस्त करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० उड्डाणपुलाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून या भागांचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन आहे.

मेट्रो डीपीआर
शहराचा विस्ताराचा वेग लक्षात घेत शहर व जिल्ह्याला जोडणारे मेट्रो मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. पीएमआरडीएच्या सर्वकष वाहतुक आराखड्यामध्ये पुणे शहराच्या हद्दीतून जाणार्या सिंहगड रस्ता ते पुणे कॅन्टोन्मेंट (९ किमी), वारजे ते स्वारगेट (११ किमी), रामवाडी ते वाघोली व वनाज ते चांदणी चौक (१० किमी), स्वारगेट ते कात्रज (६ किमी) आणि शिवाजीनगर ते हडपसर (१२ किमी) या प्रस्तावित मार्गीकांचा डीपीआर तयार करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

एचसीएमटीआर प्रकल्प
बहुचर्चित उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा मार्गिका असणार आहेत. या मार्गावर बीआरटीसाठी दोन स्वतंत्र मार्गिका असून, उर्वरित चार मार्गिका खासगी वाहनांसाठी खुल्या ठेवल्या जाणार आहेत. या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटर
वाहतुकीच्या कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौक उड्डाण पूल, मुंढवा येथे मुळा-मुठा नदीवर जुन्या पुलाची दुरुस्ती, घोरपडी येथे पुणे सोलापूर आणि पुणे-मिरज रेल्वे लाईनवर उड्डाण पूल, वखार महामंडळ चौक येथे उड्डाण पूल बांधणे, नळस्टॉप चौकात उड्डाण पूल, औंध वाकड/सांगवी रस्त्यावरील अस्तित्वातील पुलाशेजारी नवीन पूल, गोल्फ चौक येथे ग्रेड सेपरेटर किंवा सबवे बांधण, विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत संयुक्तपणे उड्डाण पूल बांधण्यासाठी तरतूद करण्यात आली असून यापुर्वी सुरू असलेल्या कामांसाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे.

खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रॅक ः
आरोग्य आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठीच्या पब्लिक बायसिकल शेअरिंग योजने अंतर्गत सायकल वापरला चालना देण्यासाठी खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना सायकल खरेदी करण्यासाठी विनाव्याज सुलभ हप्त्याने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

महत्त्वाच्या रस्त्यांसाठी तरतुदी
शिवणे-खराडी रस्ता ः
पूर्व आणि पश्‍चिम उपनगराला जोडणार्या शिवणे ते खराडी या १८ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. शिवणे ते म्हात्रे पूल या टप्प्यातील ६ किलोमीटर आणि संगमवाडी ते खराडी या टप्प्यातील ११ किलोमीटर ५०० मीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.

सक्षम सार्वजनिक वाहतूक
मिडी बसचा प्रवास दिवसभरासाठी १० रुपयात ः
मध्य पुण्यातील कमी रुंदीच्या आणि दाट गर्दी असलेल्या रस्त्यांवरील खाजगी वाहनांचा वापर करण्यासाठी पीएमपीच्या मध्यम आकाराच्या (मीडियम-मिडी) गाड्या भाडेतत्त्वावर आणल्या जातील. या गाड्यांची आसन क्षमता ३२ असेल. डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर (भवानी पेठ, गंज पेठ मार्गे) या मार्गांसह स्वारगेट-टिळक रस्ता-खजिना विहिर-आप्पा बळवंत चौक-पुणे स्टेशन मार्गे पूलगेट हा वर्तुळाकार मार्ग या गाड्यांसाठी प्रस्तावित आहे. या चार ही मार्गांवर तिकिटाचे शुल्क दिवसभरासाठी दहा रुपये राहणार आहे.

बसेस खरेदी ः
शहराच्या लोकसंख्येचा विचार करता ३०४१ बसेसची गरज आहे . सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात १४५९ बस आहेत. बसेसची संख्या वाढविण्यासाठी भाडेतत्त्वावरील ४९२ बस, ७०० ई-बस आणि ४४० सीएनजी बसचा समावेश करुन ताफ्यात समावेश करण्याचे नियोजन केल्यान ३०४१या वर्षी करण्यात आले आहे. या वर्षीच्या अंदाजपत्रकात ३०० ई-बसेसची खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील हौदांचे पुनर्जीवन ः
शहरातील पेशवे कालीन काळा हौद, खाजगीवाले बागेतील हौद, गणेश पेठ हौद, ढमढेरे बोळातील हौद, तांबट हौद, तुळशीबाग हौद, नाना वाड्यासमोरील नाना हौद, पंचहौद, फरासखाना हौद, बदामी हौद, बुधवार वाड्यातील हौद, पुणे विद्यापीठातील पुष्करणी हौद, शनिवारवाड्यातील पुष्करणी आणि हजारी कारंजे आदी हौद आहेत. यापैकी काहींची दुरावस्था झाली आहे. या हौदांचे पुनर्जीवन करून त्याद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नदीसुधारणा-काठ सौंदर्यीकरण
आंबील ओढा पुनर्विकास ः शहरामध्ये २५ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला महापूर येऊन निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जीवित हानी आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. भविष्यात अशा प्रकारच्या आपत्तीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आंबिल ओढा पुनर्विकास योजना आखण्यात येणार आहे. या योजनेत ओढ्याचे सुशोभिकरण, सिमाभिंतीची बांधणी, पाणी शुद्धीकरण, परिसराचे लॅण्डस्केप डिझायनिंग आणि जॉगिंग ट्रॅकचे विकसन या कामांचा समावेश आहे.

नालेसफाई मुख्य खात्यामार्फत
पुणे शहरात १५८.३८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ इतकी आहे. पावसाळी गटारांची लांबी १७७.९६७ किलोमीटर आणि कर्ल्व्हटची संख्या ४२९ आहे. नालेसफाई ओढे-नाल्यांमधील राडारोडा उचलणे, नदीतील घनकचरा आणि प्लास्टिक कचरा उचलण्याबरोबरच कल्व्हर्ट, पावसाळी गटारांची स्वच्छता करणे आवश्यक असते. मात्र ही कामे योग्य पद्धतीने होतात का नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणा असल्याचे दिसून येत नाही. या पुढील काळात नालेसफाईची कामे मुख्य खात्याच्या मार्ङ्गत करण्यात येणार आहेत. नाले आणि पावसाळी गटारे सफाईच्या कामाची जबाबदारी कोणावर हे निश्‍चित केले जाणार आहे.

नानाजी देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
ह्दयविकार, कर्करोग, किडनी, मज्जातंतूशी संबंधित आजार आणि शस्त्रक्रियेसाठी सुपरस्पेशालिटी सुविधांची आवश्यकता असते. सध्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या एकाही रुग्णालयात सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. पुणे शहरात महापालिकेच्या दहा हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर नानाजी देशमुख सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. खासगी भागीदारीतून लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.

अतिदक्षता विभाग
पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या ६५ रुग्णालयांपैकी एकाही ठिकाणी अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध नाही. ह्दय, कॅन्सर, किडनी, मधुमेह, श्‍वसनविकार आणि वाढत्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येेने वाढ होत आहे. अशा रुग्णांसाठी कमला नेहरु रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारण्याचे काम सुरू आहे. त्याबरोबर दळवी हॉस्पिटल, सोनावणे हॉस्पिटल आणि नायडू हॉस्पिटलमध्ये ङ्गपीपीपीफ तत्त्वावर अतिदक्षता विभाग चालविण्यात येणार आहे.

बालकांसाठी हृदयरोग निदान व उपचार सुविधा
नवजात बालकांमध्ये ह्दयाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. या विकाराचे वेळेत निदान आणि आवश्यकतेनुसार वेळेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कमला नेहरु रुग्णालयात बालकांचे हृदयरोग निदान आणि उपचार करणारी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच स्व. मधुकर बिडकर यांच्या नावाने रक्तपेढीही सुरु करण्याचे नियोजन आहे.

आरोग्य योजनांसाठी स्मार्ट हेल्थ कार्ड
पुणे महापालिकेच्या वतीने शहरी गरीब योजनेसह आजी माजी नगरसेवक व कर्मचार्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध आरोग्य योजनांसाठी स्मार्ट हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. तसेच गाडीखान्यातील मध्यवर्ती भांडारातून औषध वितरण व्यवस्थेसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे.

वैकुंठ स्मशानभूमी पुनर्विकास ः
वैकुंठ स्मशानभूमी आणि परिसराचे लॅण्डस्केप डिझायनिंग करुन सुशोभिकरण, विद्युतदाहिन्यांची संख्या वाढविणे, वाय-फाय सुविधा, अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्थेत वाढ करणे, महिला व पुरुषांसाठी स्मार्ट स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गरम पाण्याची सुविधा, स्नानगृहे, प्रसादासाठी स्वतंत्र कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता, प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना, निर्माल्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, अस्थी जतन करण्यासाठी लॉकरची सुविधा, ध्वनिक्षेपण व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था, कार्यालयाचे संगणकीकरण, ऑनलाईन पास, कर्मचार्यांसाठी सुविधा आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. याच धर्तीवर पुढील काळात शहरातील सर्व धर्मांच्या स्मशानभुमीत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

पुष्पक सेवा ः
पीएमपीच्या शववाहिनी सेवेच्या बस २० वर्षे जुन्या झाल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यातील एकाही बसला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) शववाहिनी म्हणून वापराची परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचा फटका हजारो पुणेकरांना बसत आहे. याचा विचार करुन पुणे महानगरपालिकेच्या पाच विभागांसाठी पाच नवीन बसगाड्या घेण्यात येणार आहेत.

पुणे होणार योग सिटी ः
पुणे शहराची योग सिटी म्हणून ओळख व्हावी यासाठी विविध योजनांची आखणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये योग केंद्र, प्रशिक्षक निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण संस्था, महापालिकेच्या सर्व शाळा आणि उद्यानांमध्ये प्रशिक्षक उपलब्ध करून देऊन योगासनांचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.

स्मार्ट स्वच्छतागृहे ः
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्याया कमी आहे. त्यातही महिलांच्या स्वच्छतागृहांचे प्रमाण कमी आहे. त्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्मार्ट स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. तसेच सध्या अस्तित्वात असलेली महिला स्वच्छतागृहे आणि महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांतील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. नियमित आणि स्मार्ट पद्धतीने स्वच्छतागृहांची देखभाल करण्याचे नियोजन आहे.

सारसबागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ ः
उद्यान विभागाअंतर्गत सारसबाग आणि पेशवेपार्क या दोन उद्यानांचा ५० वर्षांपूर्वी एकत्रित कायापालट करण्यात आला होता. आगामी वर्षात सारसबाग व पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास आराखडा व मास्टरप्लान तयार करून ३२ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल गार्डन्स निर्माण करण्यात येणार आहे. गणेश मंदिर व श्री देवदेवेश्वर संस्थान मध्यभागी ठेवून येथील वृक्षांना जैव विविधतेला धक्का न लावता बागेच्या परिसराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पुण्यातील पहिले बायोडायर्व्हसिटी सेंटर, ग्रंथालय, इकॉलॉजी स्टडीसाठी अध्ययन आणि माहिती केंद्र, पहिली होर्टिकल्चर पार्क, सिझनल फुलझाडांकरिता कायमचे फ्लावर गार्डन, अंबिल ओढ्याच्या काठाचा आणि पावसाचा विचार करून रेझिलियंट विकास, पूरसदृश परिस्थितीत दोन्ही काठांवर पाणी जमिनीत शोषून घेण्यास मदत करतील, विस्तीर्ण वृक्षांचा व सावलीचा मोकळा परिसर आदी बाबींचा प्रकल्पात समावेश असणार आहे. ऐतिहासिक वारसा जतन करणे, पर्यावरण रक्षण, हरित क्षेत्रात नूतन मास्टर प्लॅनिंग, सांस्कृतिक क्षेत्राचा विचार करून नूतन रचनेचे बहुआयामी व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोयीसुविधा पुरविणे, स्मार्ट सिटी व अर्बन प्लेस मेकिंगच्या मूल्यांचा विचार करण्यात येणार आहे. सारसबागेची रचना रस्त्यालगत करण्यात येणार असून, नवीन प्रकल्पात वाहनतळ, हॉकर झोन, फूड प्लाझा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. हॉकर झोन आणि फूड प्लाझा स्थलांतरीत केल्याने परिसरातील रस्ते मोकळे होतील. हा प्रकल्प बीओटी किंवा पीपीपी तत्त्वावर राबविण्याचे नियोजन आहे.

सुषमा स्वराज संवेदना पार्क ः
दिव्यांगाविषयी जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने सुषमा स्वराज संवेदना पार्क उभारण्यात येणार आहे. स्पर्श, वास, घाण आणि श्रवण यांच्या माध्यमांतून वनस्पतींचे ज्ञान होणार आहे. उद्यानामध्ये ४२ प्रकारांची झाडे लावण्यात येणार आहेत. या झाडांविषयी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीत विस्तृत माहिती दिली जाईल. पक्षांचे नैसर्गिक आणि कृत्रिम आवाज ऐकता येतील, रेलिंग पाईपवर लावलेल्या उकेरी ब्रेल लिपीमुळे अंध व्यक्ती कोणाच्याही आधाराशिवाय उद्यानात एकटे फिरू शकतील. झायलोफोेन, साउंड सिस्टिम, घाण उद्दीपनाचे कारंजे, सेन्सरी पार्क, वाळू व एक्युप्रेशर कॉर्नर, स्लाईड, जब्म्बल जिम, बेल स्टेल, टेलर ड्रेम, फ्लेश कार्ड, करन्सी चेकर आदी सुविधा असणार आहेत.

इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ः
पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेच्या विविध इमारतीतील ५० वाहनतळांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभे करण्याचे नियोजन आहे.

दहावी बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ः
महापालिका शाळांतील दहावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेणार्‍या गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क भरण्यात येणार आहे. हापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत. पुणे महापालिकेतील विद्यार्थ्यांसाठी शिवनेरीवर सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

शुक्रवार पेठ आणि सदाशिव पेठेत क्रीडा संकुल ः
शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानावर क्रीडा मैदानाचे आरक्षण आहे. क्रीडा धोरणाला अनुसरून शुक्रवार पेठेत आणि सदाशिव पेठेत क्रीडा संकुल उभारण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर या सर्व स्पर्धांचे दरवर्षी ठराविक पंधरा दिवसांच्या कालावधीत आयोजन करून क्रीडा डाविषयक जनजागृती करण्यासाठी या वर्षीपासून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

क्रीडा धोरण ः
शालेय क्रीडा धोरण, शालेय क्रीडा स्पर्धा, क्रीडा शिक्षकांना पुरस्कार, क्रीडा अभियान, कर्मचार्यांना खेळासाठी प्रोत्साहन, क्रीडा नर्सरी, अनिवासी खेळाडूंसाठी क्रीडा निकेतन, स्पोर्टस म्युझियम आणि क्रीडा माहिती केंद्र, क्रीडा आरक्षित जागांवर क्री डांगणे आणि क्रीडा संकुले विकसित करणे, खेळाडू दत्तक योजना, खेळाडूंसाठी क्रीडा सुविधा, खेळाडूंकरीता महानगरपालिकेत नोकरीचे आरक्षण, क्रीडा साहित्य अनुदान, क्रीडा शिष्यवृत्ती योजना, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पारितोषिके, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंचा सत्कार, साहसी खेळांना अर्थसहाय्य, अपघात विमा योजना आदी क्रीडा धोरणातील योजनांची अंमलबजावणी करणार आहे.

स्मार्ट व्हिलेज ः
महानगरपालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये स्मार्ट व्हिलेज ही योजना सुरू करण्यात येणार आहे. सर्वप्रकारच्या सोयीसुविधा या योजनेत दिली जातील. पहिल्या टप्प्यात लोहगाव आणि मुंढवा या दोन गावांसाठी ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.

अंदाजपत्रकातील ठळक आर्थिक तरतुदी
उत्पन्न बाजू
जीएसटी – १८३८.७६ कोटी रुपये
मिळकत कर – २३२०.२० कोटी रुपये
पाणीपट्टी – ४६१ कोटी रुपये
शासकिय अनुदान – १९४ कोटी रुपये
प्रधानमंत्री आवास योजना – ८२.६२ कोटी रुपये
बांधकाम परवानगी व शुल्क – १ हजार कोटी रुपये
इतर जमा – ८५० कोटी रुपये
कर्जरोखे -४०० कोटी रुपये

खर्च बाजू
महसुली खर्च (३८८३.४९ कोटी रुपये)

सेवकवर्ग खर्च – १८७७ कोटी रुपये
कर्ज परतफेड व व्याज – ९५.५१ कोटी रुपये
वीज खर्च व दुरूस्ती – २६२ कोटी रुपये
पाणी खर्च – ९०.३२ कोटी रुपये
औषधे खर्च – १२२.७४ कोटी रुपये
इतर खर्च – १०९७.४४ कोटी रुपये
वॉर्डस्तरीय कामे – ५४ कोटी रुपये
क्षेत्रीय कार्यालयाने करावयाची कामे – ८३.६७ कोटी रुपये

भांडवली खर्च (३६३०.८० कोटी रुपये)
भांडवली व विकासाची कामे – ३०९३.८९ कोटी रुपये
पाणी पुरवठा प्रकल्प – ५०८.४० कोटी रुपये
मलनिसा:रण प्रकल्प – २८.५१ कोटी रुपये