Pune : महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त आवश्यक गोष्टींच्या किटचे वाटप

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही. रोजचा दिवस कसा भागवायचा याची चिंता अनेक मुस्लिम कुटुंबीयांना जाणवत होती. मुस्लिम बांधवांची रमजान ईद गोड व्हावी, यासाठी पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने नागरिकांना आवश्यक असलेल्या किट चे वाटप करण्यात आले.

खासदार गिरीश बापट आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या उपस्थितीत या किटचे वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक १६, सोमवार पेठ, रास्ता पेठ मधील मुस्लिम बांधवांना हे साहित्य देण्यात आले. करोनाच्या काळात देखील माझ्या मुस्लिम बांधवांना ईद चा सण साजरा करता यावा, या भावनेतून एक कर्तव्य म्हणून हे किट भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आल्याची भावना सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केली. करोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या वतीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. करोनाबाधिताना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पालिका कटिबद्ध असून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन मुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. अशा काळात सभागृह नेते बिडकर यांनी पुढाकार घेत मुस्लिम बांधवांना दिलेली भेट कौतुकास्पद आहे, अशी भावना आमदार कांबळे यांनी व्यक्त केली. नागरिकांना औषधे उपलब्ध करून देण्याचा विषय असो अथवा खासगी रुग्णालयाने उपचारांसाठी आकारलेले वाढीव शुल्क कमी करण्याचा विषय असो सभागृह नेते बिडकर यांनी प्रत्येक गोष्टीत पाठपुरावा करत या भागातील नागरिकांना न्याय मिळवून दिल्याने कांबळे यांनी स्पष्ट केले.