Pune : महापालिकेने 28 लाख रुपयांचे भाडे थकविल्याप्रकरणी ‘त्या’ दोन प्रतिथयश भाडेकरूंच्या मालमत्तांवर चढविला बोजा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने थकबाकीदार भाडेकरूं विरोधात सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत नुकतेच सुमारे २८ लाख रुपयांची थकबाकी ठेवणार्‍या दोन प्रतिथयश ‘भाडेकरूं’ च्या मिळकतींवर बोजा चढविला आहे.

यामध्ये शिवाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्योग भवनमधील सिल्वर ज्युबिली मोटर्स आणि बुधवार पेठ घरांक क्र. ८४६ लगतच्या महापालिकेच्या मालकिच्या जागेतील भाडेकरू लक्ष्मण भुरूक व त्यांचे वारस पुत्र जितेंद्र लक्ष्मण भुरूक यांचा समावेश आहे. सिल्वर जुबिली मोटर्सचे १८ लाख ८४ हजार ७२० रुपये भाडे थकित आहे. थकित भाडे भरावे यासाठी संबधित कंपनीला वेळोवेळी नोटीसेस दिल्या आहेत. परंतू संबधित कंपनीने प्रतिसाद न दिल्याने पुणे तहसील कार्यालयाच्या परवानगीने कंपनीच्या हडपसर येथील स्थावर मिळकतींवर बोजा चढविला आहे.

बुधवार पेठ घर क. ८४६ लगतची जागा भुरूक कुटुंबियांना भाडेकराराव देण्यात आली होती. या जागेचे आतापर्यंतचे ९ लाख २७ हजार ६५६ भाडे थकले आहे. त्यांनाही भाडे भरण्यासंदर्भात वेळोवेळी नोटीसेस बजावण्यात आल्या तसेच त्यांच्या मिळकतीवर बोजा चढविण्यात येईल, याबाबतही कळविण्यात आले होते. मात्र, त्यांनीही कुठलाच प्रतिसाद न दिल्याने भुरूक यांच्या मालकिच्या बुधवार पेठेतील फ्लॅटवर बोजा चढविण्यात आल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

कोरोना काळात महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने थकित भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली आहे. मागीलवर्षी महापालिकेने एसआर प्रोजेक्टसाठी विविध बांधकाम व्यावसायीकांना भाडेकराराने दिलेल्या सदनिका, महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागेमधील भाडेकरूंकडून थकबाकी वसुली तसेच करार संपलेल्या मिळकतींचे नव्या नियमावलीनुसार भाडेआकारणी करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला अभुतपूर्व यश आले आहे. दरवर्षी या विभागाला २० ते २२ कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, या मोहीमेमुळे २०२०-२१ या वर्षात ५० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासोबतच महापालिकेच्या मिळकतींचे रक्षण करण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाने राबविलेली विशेष मोहीम यापुढेही सुरूच राहाणार आहे. यासाठी सर्वच कायदेशीर बाबींचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे थकबाकीदार भाडेकरूंनी तातडीने थकबाकी भरावी व कारवाई टाळावी, असे आवाहन मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी केले आहे.