Pune : पालिकेचे व्यवस्थापन चुकले, गल्लोगल्ली विसर्जन हौद वाढले : काँग्रेसचे गटनेते आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गणेश विसर्जनाबाबतचे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे धोरण आणि व्यवस्थापन चुकत गेल्याने शहरात गल्लोगल्ली विसर्जन हौद बांधले गेले आहेत, अशी टीका महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये याकरीता गणपती विसर्जन नदीत करण्यावर बंदी घालण्यात आली, क्षेत्रिय कार्यालयांमार्फत हौद बांधण्यात येणार नाहीत असेही जाहीर करण्यात आले आणि घरोघरीच गणपती विसर्जन करा, तसेच गणेश मंडळांनी आपापल्या मंडपातच गणपती विसर्जनाची व्यवस्था करावी असे आवाहन महापौरांनी केले. विसर्जनासाठी क्षेत्रिय कार्यालयातून अमोनियम बाय कार्बोनेट पावडर देण्याची व्यवस्थाही महापालिकेने केली.

त्यानंतर अचानक धोरण बदलण्यात आले आणि फिरते हौद केले जातील असे प्रशासनाने जाहीर केले. फिरते हौद झालेच. शिवाय नगरसेवकांनीही काही ठिकाणी हौद बांधले. त्याचबरोबर काही गणपती मंडळांनीही विसर्जन हौद बांधले. प्रत्येक प्रभागात पाच-पाच विसर्जन हौद बांधले गेले आहेत. त्या कारणाने गल्ली-बोळात विसर्जन हौद तयार झाले. हजारो लोकांनी हौदातच गणपती विसर्जन केले आणि गर्दी टाळण्याच्या हेतू फसला.घरोघरचे गणपती विसर्जनासाठी सदतीस लाख रुपयांची अमोनियम बाय कार्बोनेट पावडर महापालिकेने खरेदी केली.

परंतु ही पावडर टाकून आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन करणे अनेकांना पटले नाही. ज्या नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयातून पावडर घेतली होती त्यातील अनेकांनी ती टाकून दिली. पावडरवर झालेला खर्च वाया गेला. दरवर्षी १५ क्षेत्रिय कार्यालयांमार्फत ५० हौद उभे करण्यात येतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन व्यवस्था योग्य नियोजनकरुन व्हायला हवी होती. परंतु पालिकेतील सत्ताधारी पदिधिकारी धोरण बदलत राहिले. प्रशासनाचे व्यवस्थापन चुकले त्यामुळे हौदांची संख्या वाढली. अक्षरशः गल्लोगल्ली हौद झाले. विसर्जन व्यवस्थेवरचा पालिकेचा खर्च वाढला असे बागुल यांनी पत्रकात म्हटले आहे.