पुणे महापालिकेचे नगरसचिव सुनिल पारखी सेवानिवृत्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या मागील ५० वर्षांच्या इतिहासामध्ये सर्वाधीक काळ नगरसचिवपद भुषविणारे सुनिल नारायण पारखी हे आज सेवानिवृत्त झाले. कायद्याचे ज्ञान, निष्पक्ष भुमिका आणि मृदू स्वभावामुळे सर्वच राजकिय पक्षांच्या नगरसेवकांमध्ये लोकप्रिय ठरलेले सुनिल पारखी यांना महापौरांसह विविध पदाधिकार्‍यांनी पुढील काळासाही शुभेच्छा दिल्या. जानेवारी १९८५ मध्ये महापालिकेच्या नगरसचिव विभागात कनिष्ठ लिपिक पदावर रूजू झालेल्या पारखी यांनी त्यानंतर कायद्याची पदवी घेतली. १९९१ मध्ये त्यांना समिती लेखनिक या पदावर बढती मिळाली तर २००३ मध्ये ते महापौरांचे स्वीय सचिव झाले.

२००५ मध्ये उपनगरसचिव पदावर पदोन्नती झाली. तर १ जानेवारी २००९ मध्ये ते नगरसचिव झाले. नगरसचिव विभागातील दीर्घ अनुभव, सभा कामकाज नियमावलींचा अभ्यास आणि निष्पक्ष कामकाज पद्धती यामुळे ते नगरसेवक आणि अधिकारी वर्गामध्ये नावाजले गेले आहेत. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी अभ्यासपूर्वक नवीन सभा कामकाज नियमावली तयार केली आहे. ही नियमावली सध्या पक्षनेत्यांच्या बैठकीपुढे आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर १९४९ ते १९६५ दरम्यान अ.कृ. जाधव यांनी सलग १५ वर्ष नगरसचिवपदावर काम केले आहे. यानंतर पारखी हे या पदावर प्रदीर्घ काम करणारे नगरसचिव ठरले आहेत.

जुन्या शहराचा विकास आराखडा, जेएनआययूएम योजना, स्मार्ट सिटी प्रकल्पाला मंजुरी, चोवीस तास पाणी पुरवठा योजना, ११ गावांचा समावेश अशा शहरावर दीर्घकालीन परिणाम करणार्‍या योजनांना मंजुरीच्या सभा चांगल्याच गाजल्या. नव्याने समाविष्ट होणार्‍या गावांचा आणि नगरसेवकांची संख्या वाढेल याचा अंदाज आल्याने विस्तारीत महापालिका भवनमध्ये प्रशस्त सभागृह असावे यासाठी त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांकडे आणि पदाधिकार्‍यांकडेही पाठपुरावा केला होता. नवी मुंबई महापालिकेमध्ये नगरसचिवांची नियुक्ती करण्यासाठी इंटरव्यूव्ह आयोजित केले होते. इंटरव्यूव्ह घेणार्‍यांच्या पॅनेलमध्ये पारखी यांचा विशेष सहभाग करून घेण्यात आला होता.