समाज विकास विभागात ‘गोलमाल’ ! अधिकारीच स्वंयसेवी संस्थेव्दारे घेतात ‘मलिदा’ अन् ‘कंत्राटे’, संबंधितांच्या निलंबनाची नगरसेवक बागवेंची मागणी

पुणे (शिवाजीनगर) : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या समाज विकास विभागातील अधिकार्‍यानेच धर्मादाय आयुक्त कार्यालयात खोट्या माहितीच्या आधारे स्वंयसेवी संस्थेची नोंदणी करुन त्याद्वारे याच विभागातील लाखो रुपयांची कंत्राटे घेतल्याचा आरोप काॅंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला. या अधिकार्‍यासह याच विभागातील समाजसेवक पदावर असलेल्या त्याच्या स्वंयसेवी संस्थेतील सहकार्‍याला तातडीने निलंबीत करावे, अशी मागणीही बागवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

अविनाश बागवे यांनी सांगितले, की महापालिकेचे अधिकारी आणि सेवकांना महापालिकेच्या कुठल्याही निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही, असा नियम आहे. मात्र, समाजविकास विभागाकडील उपसमाज विकास अधिकारी मुकुंदा महाजन आणि समाजसेवक कैलास खुळे यांनी सुप्रभा नावाने स्वंयसेवी संस्था स्थापन केली आहे. या स्वंयसेवी संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करताना स्वत:च्या माहितीमध्ये महापालिकेतील नोकरी ऐवजी व्यवसाय करत असल्याची माहिती दिली आहे.

या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाज विकास विभागाच्या माध्यमांतून केल्या जाणार्‍या जनजागृती, समुपदेशन व अन्य कामांच्या निविदा व बिननिविदेने करण्यात येणारी कामे घेतली आहेत. मागील चार वर्षांपासून त्यांच्या हा उद्योग सुरू आहे. त्यांच्यासोबतच या संस्थेत समाजविकास विभागातील निवृत्त झालेल्या काही कर्मचार्‍यांचाही सहभाग आहे. महाजन आणि खुळे याच विभागामध्ये कार्यरत असल्याने त्यांनी गैरपद्धतीने निविदा घेतात. विशेष असे की संस्थेने केलेल्या कामांची बिलेही तेच काढतात. मागील चार वर्षात त्यांनी ज्यादा रकमेची बिले काढून महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्‍वभूमीवर या दोघांची तातडीने अन्य खात्यात बदली करून चौकशी करण्यात यावी व निलंबीत करण्यात यावे. हे दोघेही समाज विकास विभाग कार्यालयाकडील नोंदींमध्ये फेरफार करण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र आणि पुरावे दिले असून धर्मादाय आयुक्तांकडेही तक्रार करणार असल्याची माहितीही बागवे यांनी यावेळी दिली.