Pune : महापालिकेने 74 ऍम्ब्युलन्समध्ये उपलब्ध केली ऑक्सीजनची सुविधा, तातडीच्या वेळी ‘या’ नंबरवर करा कॉल, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्णांसाठी ऑक्सीजनची सुविधा असलेल्या ऍम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने एक पाउल पुढे टाकले आहे. महापालिकेने त्यांच्याकडील ७४ ऍम्ब्युलन्समध्ये ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रुग्णाला हॉस्पीटलाईज्ड करेपर्यंत या सुविधा महत्वपूर्ण ठरणार आहे. या सुविधेसाठी शासनाच्या १०८ अथवा नियंत्रण कक्षाशी ९६८९९३९३८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वाहन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली.

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकदा होम क्वारंटाईन अथवा कोव्हीड सेंटरमध्ये असलेल्या कोरोना बाधितांची ऑक्सीजन लेव्हल कमी होउन श्‍वसनात अडचणी आल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. अशातच ऑक्सीजन बेडस् उपलब्ध होण्यासाठी काहीवेळ जातो.मधल्या काळात रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ऑक्सीजनची सुविधा असलेल्या ऍम्ब्युलन्सची गरज भासते. यासाठी महाापलिकेच्या ७४ ऍम्ब्युलन्समध्ये ऑक्सीजनची सुविधा करण्यात आली आहे. साधारण रुग्णाला रुग्णालयात दाखल करेपर्यंत दोन तास ऑक्सीजन पुरवठा करणे आणि जिविताचा धोका कमी करण्यास याची मदत होईल, असेही उदास यांनी नमूद केले आहे.

ऑक्सीजनची सुविधा असलेल्या ऍम्ब्युलन्स २४ तास सेवेत राहाणार असून शासनाच्या १०८ अथवा नियंत्रण कक्षाशी ९६८९९३९३८१ या क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना ही ऍम्ब्युलन्स उपलब्ध होणार आहे. महापालिकेची १५ क्षेत्रिय कार्यालय, कोव्हीड सेंटर्स तसेच रुग्णांलयांच्या परिसरात या ऍम्ब्युलन्स ठेवण्यात येणार असून कमीत कमी वेळेत शहराच्या कुठल्याही भागात पोहोचणे शक्य होणार आहे, असे उदास यांनी सांगितले.