Pune : महापालिकेने अँटीजेन कीटद्वारे ‘कोरोना’ चाचण्या कमी केल्या : रुबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महापालिकेने कोरोना बाधितांच्या तपासण्या करताना अँटीजेन कीटद्वारे चाचण्यांचे प्रमाण कमी केले आहे. केंद्र शासनाच्या गाईडलाईन नुसार आरटीपीसीआर (घशातील द्रवाची प्रयोगशाळेत तपासणी) अधिकाअधिक चाचण्या घेण्यात येणार असून त्यापेक्षा निम्म्या चाचण्या अँटीजेनद्वारे घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

महापालिकेने शहरातील प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयातील हद्दींसह २३ ठिकाणी कोव्हीड चाचणी केंद्र सुरू केली आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांचा तातडीने शोध घेउन त्यांची कोव्हीड तपासणी करण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून आयसीएमआरच्या आदेशानुसार अँटीजेन कीटचा वापर करण्यात येत आहे. अँटीजेन टेस्टची सत्यता ६५ टक्क्यांपर्यंत असून अर्धा तासात जागेवरच तपासणीचा अहवाल मिळत असल्याने अनेक नागरिक त्यालाच पसंती देतात. विशेष करून नगरसेवकांनीही प्रभागामध्ये कोव्हीड चाचणी केंद्र सुरू करून संशयितांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. परंतू मागील दोन दिवसांपासून महापालिकेने बहुतांश सेंटरवरील अँटीजेन कीटद्वारे केल्या जाणार्‍या तपासण्या कमी केल्या आहेत. किंबहुना काही सेंटर्सवरील तपासण्याच बंद केल्याने नगरसेवकांकडून तक्रारी येउ लागल्या आहेत.
यासंदर्भात विचारणा केली असताना अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांची सांगितले, की केंद्राकडून नव्याने आलेल्या गाईडलाईननुसार आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्टचे प्रमाण १:१ पेक्षाही कमी असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात महापालिका क्षेत्रात कोरोना संशयितांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने अँटीजेन टेस्ट वाढविल्या होत्या. मागील दोन ते तीन दिवसांपासून दररोज सरासरी सात हजार टेस्ट केल्या जात असून त्यापैकी ५ हजार चाचण्या या आरटीपीसीआर पद्धतीने होत असून अँटीजेन कीटद्वारे २ हजार चाचण्या करण्यात येत आहेत.