पुण्यात शिक्षक ‘कोरोना’ पॉझिटीव्ह आढळल्याने शाळा करावी लागली बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शाळा, कॉलेज, महाविद्यालय, बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु आता कोंढव्यातील महापालिकेच्या संत गाडगेबाबा शाळेतील एक शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर शाळा बंद करण्यात आली आहे. या शाळेतील इतर शिक्षकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

पुणे महापालिकेने गेल्या महिन्यातच शाळा सुरु केल्या होत्या. आधी नववी, दहावी आणि नंतर माध्यमिकचे वर्ग सुरु करण्यात आले होते. शाळा सुरु होण्यापुर्वी संपूर्ण शाळेची स्वच्छता आणि शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या. पुण्यात रुग्ण संख्या लक्षात घेता राज्यापेक्षा उशीरानेच शहरातील शाळा सुरु करण्यात आल्या.

मात्र कोंढव्यातील संत गाडगेबाबा शाळेत एक शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शाळा तातडीने बंद केली. या शाळेतील इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. या शाळेत येणाऱ्या 150 विद्यार्थ्यांनाही निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यापैकी कोणाला कोरोनाची लक्षण आढळून आल्यास त्यांची तातडीने चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.