Vaccination in Pune : पुण्यात आणखी 7 लसीकरण केंद्र कार्यान्वित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून (दि.1) प्रारंभ झाला आहे. यात 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुणे महापालिका हद्दीत महापालिकेकडून 4 केंद्र सुरु केली होती. मंगळवारी (दि. 2) आणखी सात केंद्रांवर लसीकरण सुरु केले आहे. तसेच खासगी रुग्णालयांनाही महापालिकेकडून लस पुरविली जाणार असल्याचे अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.

महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयामध्ये 100 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मंगळवारी लस घेतली. येत्या काही दिवसात 40 केंद्र कार्यान्वित केली जाणार आहे. सीजीएचएस आणि एमजीपीवाय या योजनांसह एकूण 70 ते 80 रुग्णालयातील केंद्रांवर आगामी काही दिवसात लसीकरण सुरु होणार आहे. तसेच लसीकरणामध्ये सर्वाधिक अडचणी को-विन’ अ‍ॅपमुळे येत होत्या, ही प्रणाली अद्यावत केल्याचे अगरवाल म्हणाल्या. ज्या प्रमाणात लसीकरण होत जाईल त्याप्रमाणे लस देण्यात येईल. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयांना पालिकेकडून लस पुरविली जाणार आहे. त्यापोटी रुग्णालयांना पालिकेला प्रतिलस 150 रुपये द्यावे लागतील. आतापर्यंत 1 लाख 92 हजार डोस पालिकेला प्राप्त झाले आहेत. पुणे खासगी रुग्णालयांनी पैसे भरल्यानंतर ही लस त्यांना देण्यात येणार असल्याचे अगरवाल म्हणाल्या.