Pune : ‘महापालिकेचा कोरोना डॅशबोर्ड अधिक अचूक करण्यासाठी पावले उचलली; कंट्रोल रुममधील ‘त्या’ महिला कर्मचार्‍याचे निलंबन’ – मनपा आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून शहरातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या महिन्यांभरात निम्म्यावर आली आहे. कोरोना बेडस्च्या नियोजनासाठी करण्यात आलेला डॅशबोर्ड अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच बुधवारी एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयातून बेडबाबत आलेल्या फोन कॉलला बेजबाबदार उत्तर देणार्‍या महिला कर्मचार्‍याला निलंबीत करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की बुधवारी उच्च न्यायालयात एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी एका वकिलाला पुणे महापालिकेच्या कोरोना कंट्रोलरुमला फोन लावून व्हेंटीलेटर बेड उपलब्धतेबाबत विचारणा करायला सांगितले. नेमके त्याचवेळी कंट्रोल रुमधून फोन रिसिव्ह केलेल्या महिला कर्मचार्‍याने बेड शिल्लक नसल्याचे सांगितले. तसेच संबधितांकडून रुग्णाबाबत कुठलिच माहिती घेतली नाही. वास्तविकत: त्यावेळी डॅशबोर्डवर एका खाजगी रुग्णालयात पाच बेडस् शिल्लक असल्याचे दिसत होते. एका कर्मचार्‍यामुळे महापालिकेची चांगलीच नाचक्की झाली.

यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की संबधित महिला कर्मचार्‍याला आज निलंबीत करण्यात आले आहे. महापालिकेचा डॅशबोर्ड स्थापन केल्यापासून आतापर्यंत ७ हजार ७०० रुग्णांना बेडस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कंट्रोलरुमचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. याठिकाणी तीन शिफ्टमध्ये ५१ कर्मचारी काम करत आहेत. काल घडलेल्या प्रकारानंतर मी, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी कंट्रोल रुमचा पुन्हा आढावा घेतला. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्या तातडीने दुरूस्त करण्यासाठी सहा अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंट्रोल रुमला येणार्‍या प्रत्येक कॉलची माहिती विहित नमुन्यांतील अर्जामध्ये भरून घेण्यात येत आहे. याकडे अधिक कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी तंबी तेथील कर्मचार्‍यांना देण्यात आली आहे.

यासोबतच शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल व डिस्चार्ज होणार्‍या रुग्णांची माहिती अपडेट करण्यासाठी महापालिकेने सर्व रुग्णालयांमध्ये नियुक्त केलेल्या महापालिका कर्मचार्‍यांकडे सोपविली आहे. साधारण पाच ते सहा तासांनी डॅशबोर्ड अपडेट करण्यातील तांत्रिक अडचणी यामुळे कमी होतील, असा दावा विक्रम कुमार यांनी यावेळी केला.

महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात ऑक्सीजन टँक बसविण्यात आले आहेत. याठिकाणी ऑक्सीजन रिफिलिंग प्लांटही आजपासून कार्यन्वीत करण्यात आला आहे. यामुळे याठिकाणी ऑक्सीजन सिलिंडर्स भरण्याची सुविधाही उपलब्ध होणार असल्याने शहरातील कुठल्याही रुग्णालयाला गतीने ऑक्सीजन पुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून ऑक्सीजनअभावी होणारी गैरसोयही टळेल, असा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे.

जम्बो हॉस्पीटलमध्ये ५० जंबो बेडस् रिक्त

शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, याठिकाणी ग्रामीण व अन्य जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. महापालिका संचलित शिवाजीनगर येथील सीओईपी जंबो हॉस्पीटलमधील ५० ऑक्सीजन बेडस् सध्या रिक्त असल्याचेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.