Pune : मल्टीमोडल ट्रान्झीट हबमधील 50 टक्के हिस्सा महापालिकेला मिळणार ! नगरसेवक आबा बागुल यांच्या प्रस्तावाला पालिकेचा सकारात्मक अभिप्राय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   स्वारगेट येथे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या जागेवर महामेट्रोच्यावतीने २८ हजार चौ. मी. जागेवर उभारण्यात येणार्‍या मल्टीमोडल ट्रान्झीट हबमधील ५० टक्के हिस्सा महापालिकेला देण्याची मागणी महामेट्रोकडे करण्यात आली आहे.

कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी स्थायी समितीला दिलेल्या प्रस्तावावर अभिप्राय देताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली आहे. महामेट्रोने मेट्रोच्या विकास आराखड्यामध्ये नसलेल्या किंवा व्यावसायीक वापारासाठी जागांची मागणी केल्यास महापालिकेने धोरणानुसार निर्णय घेणे योग्य राहाणार आहे. स्वारगेट येथे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या जागेवर महामेट्रो मल्टीमोडल ट्रान्झीट हब उभारण्यात येणार आहे. या मल्टीमोडल हबचा व्यावसायीक कारणासाठी वापर करण्यात येणार आहे. ही जागा महामेट्रोच्या मूळच्या विकास आराखड्यामध्ये नसल्याने मल्टीमोडल ट्रान्झीट हबमध्ये होणार्‍या ५० टक्के बांधकामाचा हिस्सा मागणी करण्यास काही हरकत नाही.

महापालिकेने महामेट्रोकडे मल्टीमोडल ट्रान्झीट हबमधून येणारया उत्पन्नाच्या ५० टक्के हिस्सा तसेच मेट्रोमार्फत उभारण्यात येणार्‍या व्यावसायीक वापराच्या बांधकामाच्या ५० टक्के हिस्सा महापालिकेला देण्यासंदर्भात मागणी केली आहे, असेही विक्रम कुमार यांनी या अभिप्रायामध्ये नमूद केले आहे.
कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी स्वारगेट येथील जागा महामेट्रोला दिली आहे. महामेट्रो या जागेतील मेट्रोस्टेशन वगळता अन्य जागेचा वापर व्यावसायीक वापर करून नफा मिळवणार आहे. महापालिकेची जागा असताना या जागेच्या व्यावसायीक वापरातून मिळणार्‍या नफ्यातून महापालिकेला ४० ते५० टक्के हिस्सा मिळावा असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला आहे. स्थायी समितीने यावर प्रशासनाचा अभिप्राय मागविला होता. त्यावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिल्याने पुढील काही वर्षात महापालिकेला उत्पन्नाचा मार्ग निर्माण होणार आहे. महापालिकेने हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर महामेट्रो यासंदर्भात काय भुमिका घेणार हे देखिल औत्सुक्याचे ठरणार आहे.