Pune : कोरोना बाधित लहान मुलांवरील उपचारासाठी महापालिकाही स्थापन करणार ‘टास्कफोर्स’ – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या संभाव्या तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे महापालिकेने कोरोना बाधित लहान मुलांवर उपचारासाठी पुढाकार घेत येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात ५० बेडस्चा स्वतंत्र कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानीक आमदार सुनिल टिंगरे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच नुकतेच महापालिकेने बालरोग तज्ज्ञ व सहाय्यक भरतीची प्रक्रिया देखिल सुरू केली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की ते उद्या शहरातील बालरोग तज्ज्ञांशी ऑनलाईन चर्चा करणार आहेत. कोरोना व अन्य आजारांसंबधित त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली जाईल. लहान मुले कोरोनाच्या लाटेपासून दूर राहातील, याचदृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच, बाधित झालेल्या मुलांवरील उपचार व लसीकरण यादृष्टीने परिस्थिती हाताळण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल. दरम्यान, राज्य शासनानेही कोरोना बाधित लहान मुलांवरील उपचारासाठी ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून राज्य शासन व महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोना विरोधातील लढाईला चांगले बळ मिळेल, अशी अपेक्षा वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.