Pune : महापालिका पुणेकरांना कोरोनाची लस उपलब्ध करून देणार – भाजप शहरअध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लसीकरणाबाबत राज्य सरकारने दुजाभाव केला तरी महापालिका पुणेकरांना कोरोनाची लस उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली. भाजपचे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना लसीकरणावरही चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुळीक यांनी ही घोषणा केली. मुळीक म्हणाले, की राज्य शासन पुणे महापालिकेसोबत दुजाभाव करत आहे. परंतू आम्ही पुणेकरांशी बांधिल असून आम्ही सर्वांची लसीकरण करण्यास तयार आहोत. यासाठी लस खरेदीसाठीचे ग्लोबल टेंडर काढण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना आयुक्तांना केली आहे.

यासोेबतच लस उपलब्ध झाल्यानंतर दररोज ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी मतदानकेंद्र निहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणीही आयुक्तांकडे करण्यात आली. तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका आणि लहान मुलांचा विचार करुन त्यांच्यावरील उपचारासाठी चार स्वतंत्र एनआयसीयू हॉस्पीटल उभारावीत. तसेच पोस्ट कोव्हिड उपचारासाठी सेंटर्स सुरू करण्यात यावीत, अशी मागणी केली. यासोबतच अंदाजपत्रकातील आरोग्य, शिक्षण आणि समाज विकास विभागाच्या योजनांना प्राधान्य द्यावे, प्रलंबित प्रकल्पांना गति द्यावी, नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील स्थानीक स्तरावरील विकास कामांना गती द्यावी, अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आल्याचे मुळीक यांनी नमूद केले. परंतू वरिल सर्व मागण्यांना आयुक्तांनी काय आश्‍वासन दिले, याबाबत मुळीक यांनी माहिती दिली नाही.

बैठकीत ‘स’ यादीवर डोळा

बैठकीमध्ये भाजपच्या ज्येष्ठ सदस्याने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘स’ यादीतून नगरसेवकांना कोव्हिड १९ च्या उपाययोजनांबाबत कामे करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्थायी समितीने सदस्यांच्या ‘स’ यादीतून कोरोना लढ्यासाठी ३५० कोटी रुपये उत्पन्न मिळवून दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर या चर्चेवर पडदा पडला, अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेल्या सूत्रांनी दिली.

खरंच ‘महापालिकेची’ लस मिळणार!

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी लसीकरणावर विचारलेल्या प्रश्‍नावर लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणाची गति मंदावली आहे. लसच उपलब्ध नाही तर आम्ही काय फाशी घ्यायची का? अशी उद्विघ्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या त्यांच्याच पक्षाने लसीकरणाबाबत राज्य सरकार दुजाभाव करत असल्याने महापालिकाच लस खरेदी करून पुणेकरांचे लसीकरण करेल, अशी घोषणा केल्याचा विरोधाभास दिसून येत आहे. त्यामुळे पुणेकरांना खरेच महापालिकेची ‘लस’ मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.