पुणे महापालिकेनं घेतला महत्वाचा निर्णय, पुणेकरांना मिळाला दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शहरी भागासोबत ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार वाढला आहे. त्यातच सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि पुण्यात आढळून आले आहे. देशात जून महिन्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने पुणे महापालिकेने पुणेकरांना दिलासा देत आणखी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

मागील सहा महिन्यांपासून टाळेबंदीमुळे ठप्प असलेला हॉटेल व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशातच पुणे महापालिकेने हॉटेल व्यवसायिक तसेच नागरिकांना मोठा दिलासा आहे. पुण्यात पार्सल सेवेसाठी हॉटेल्स आता रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना आता रात्री उशिरापर्यंत पार्सल्स घरी मागवता येणार आहे.

यापूर्वी हॉटेल्समधून पार्सल्स मागण्यासाठी संध्याकाळी ७ ची वेळ देण्यात आली होती. मात्र, संध्याकाळनंतर हॉटेलमधून पार्सल मागवण्याचे प्रमाण वाढले होते. पण वेळेची मर्यादा असल्याने ग्राहकांची गैरसोय होत होती. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेने रात्री १० पर्यंत हॉटेल्समधून पार्सल्स मागवण्याची परवानगी दिली आहे. पुण्यात वाढता कोरोनाचा प्रभाव पाहता पुणेकर फारसे बाहेरच खाणं टाळत आहेत. त्यामुळे हॉटेल्स व्यवसायिक २० टक्केच व्यवसाय होत असल्याने अडचणीत सापडले होते. हॉटेल व्यवसायाला चालना देण्यासाठी पुणे महापालिकेने वेळेत वाढ केल्याने, ग्राहक तसेच हॉटेल्स व्यवसायिकांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलं
शुक्रवारी राज्यात १७ हजार ७९४ कोरोना बाधित रुग्ण सापडले. तर १९ हजार ५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच ४१६ जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्क्यांवर गेलं आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गुरुवारी राज्यात दिवसभरात १९ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आले. तर १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच दिवसभरात ४५९ जणांचा बळी गेला.