Pune : पुणे महापालिकेकडून ‘रमजान’ महिन्यासाठी नियमावली जाहीर, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यातील वाढत्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शहरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु आहे. याच दरम्यान मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकाने नियमावली जाहीर केली आहे. यात मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमावर बंदी घातली आहे. तसेच नमाज पठण, इफ्तारसाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. धार्मिक स्थळ आणि प्रार्थना स्थळांवर एकत्रित येण्यास बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. रमजान महिना संपेपर्यंत या नियमांचे पालन बंधनकारक राहणार आहे.

रमजानसाठी महापालिकेची नियमावली खालीलप्रमाणेः

1)  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण तसेच इफ्तारसाठी मस्जिद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. घरातूनच सर्व धार्मिक कार्यक्रम साजरे करावेत. तसेच सोशल डिस्टनसिंग व स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे.

2)  रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येतात. परंतु, यावेळी कोरोनाचा वाढता पाहता आपापल्या घरातूनच दुवा पठण करावे.

3)  धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करून बंद जागेत शक्यतो ऑनलाईन करावे.

4)  महापालिका हद्दीत संचारबंदी असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

5)  रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, धार्मिक, सामाजिक , सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये.

6)  मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते,राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या उद्देशाने जनजागृती करावी.

7)  राज्य शासन, महापालिका प्रशासन, पोलीस यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.