Pune : पालिका आरोग्य विभागाने खराडी परिसरातील 3 हॉटेल्स केली सील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शुक्रवारी सकाळी 11 ते सोमवारी सकाळी 7 दरम्यान हॉस्पिटल्स, औषधालयांसह अत्यावश्यक सेवा वगळता पर्यंत कडक निर्बंध केले आहेत. हॉटेल्स, दुकाने उघडी असतील, तर त्यांना समजावून सांगण्याचे काम पालिकेच्या वतीने नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक करीत होते. त्यावेळी खराडी जकात नाका परिसरातील वाघेश्वर अमृततुल्य हॉटेल, रॉयल मराठा आणि एस.के. वडेवाला अशा तीन हॉटेल्सने नियमभंग केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने शनिवारी (दि. 8 मे) कारवाई करून सील केली, अशी माहिती आरोग्य निरीक्षिका सोनिया अभोणकर यांनी दिली.

महानगरपालिकेच्या नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक पालिका हद्दीमध्ये पाहणी करीत होते. त्यावेळी विमाननगर येथे सज्जद जमील खान (वय 26, रा. संजय पार्क, विमाननगर) याला पानटपरी का सुरू ठेवली, असे विचारले. त्यावेळी तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका, आम्हाला नियम माहिती आहेत. उलटसुलट उत्तरे देत अरेरावी केली, त्याच्या गाडीमध्ये गुटखा, सिगारेट असा ऐवज आढळून आला, त्यामुळे त्याच्यासह गाडीवर विमानतळ पोलीस स्टेशनच्या मार्शलला घटनास्थळी बोलावून घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक शंकर जगताप, आरोग्य निरीक्षिका सोनिया अभोणकर, हनुमंत साळवी, समीर खुळे, संदेश रोडे, मनोज देवकर, अरुण बहारिया यांच्या पथकाने ही कारावई केली.