पुण्यातील डुक्कर खिंडीतील खूनाचा पर्दाफाश, चौघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – डुक्कर खिंड परिसरात दुचाकीतून पेट्रोल चोरी केल्यावरून झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

श्रीकांत दत्तोबा सोनवणे (वय 38, रा. म्हाडा वसाहत, वारजे), निलेश सुरेश गायकवाड (वय 36, रा. मारुती मंदिर, दत्तवाडी), बबन बाळासाहेब ठाकर (वय 38, रा. एनडीए रोड, शिवणे) आणि गौतम वामन शिंदे (वय 34, रा. समर्थ सोसायटी, शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यात प्रशांत अच्युतराव ढाकणे (वय 35 ,रा. गुरुकृपा वॉशिंग सेंटर, वारजे, मुळ बीड) याचा खून झाला. याबाबत मित्र संजय ऐदाळे (वय 38) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाकणे हा पानटपरीवर काम करत होता. त्याची व फिर्यादी यांची एक महिन्यापूर्वीच मैत्री झाली होती. ढाकणे याच्या टपरी शेजारी असलेल्या वाॅशिंग सेंटरवर एकाने दुचाकी सोडली होती. त्यावेळी ढाकणे हा दुचाकीतून पेट्रोल चोरी करत होता.
यावेळी दुचाकी चालकाने हा प्रकार पाहिला. त्यावेळी कारमधून तो व साथीदार आले. त्यांनी पेट्रोल चोरी करताना पाहीले असता ढाकणे यांना बेदम मारहाण केली. त्यात ढाकणेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळाताच वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम, गुन्हे निरीक्षक अमृत मराठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानुसार या आरोपीची माहिती मिळाली. त्यांनतर तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अमोल कदम, उपनिरीक्षक येवले व त्यांच्या पथकाने या चौघांना अटक केली. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.