धक्कादायक ! बहिणीच्या विम्याचे ३० लाख मिळावेत म्हणून केला खून ; निनावी अर्जामुळे खुनाला फुटली वाचा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वारंवार पैसे मागाायची म्हणून त्याचे बहिणीबरोबर भांडण झाले. त्यात तिचा मृत्यु झाला. तिच्या विमा पॉलिसीचे ३० लाख रुपये मिळावे म्हणून भावानेच हा मृत्यु अपघाती असल्याचे त्याने दर्शविले. पण एका निनावी अर्जामुळे तब्बल ६ महिन्यांनंतर खुनाला वाचा फुटली आणि हिंजवडी पोलिसांनी भावाला अटक केली.

जॉन डॅनियल बोर्डे (वय ४०, रा. सौदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) असे त्याचे नाव आहे. या घटनेत त्याची बहिण संगीता मनिष हिवाळे हिचा मृत्यु झाला असून ही घटना ९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घरात घडली होती.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, जॉन बोर्डे आणि संगीता हिवाळे हे बहिण भाऊ आहेत. पतीबरोबर भांडणे झाल्याने संगीता जॉनच्या घरी रहात असे. ती वारंवार पैसे मागत असल्यावरुन त्यांच्यात भांडणे होत असत. ९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री नऊच्या सुमारास पुन्हा जॉनकडे खर्चासाठी पैसे मागितले. यावरुन त्यांच्यात भांडण झाले. तेव्हा त्याने तिचे डोके जोरात फरशीवर आपटले. त्यात तिचा खुन झाला. तिच्या मृत्युबद्दल घरातील कोणाला शंका येऊ नये म्हणून तिचा मृत्यु हा अपघाती झाला आहे, हे दाखविण्यासाठी त्याने प्रयत्न केला. तिचा पती मनीष हा विमा एजंट असल्याने त्याने तिचा ३० लाख रुपयांचा विमा उतरविला होता. ते पैसेही मिळतील या हेतूने जॉन ने आपल्या कारमधून तिला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असल्याचे भासवले व संगिता, आई आणि सायमन यांना बरोबर घेतले. तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊ असे सांगून त्याने गाडी वाकड येथील सयाजी हॉटेलचे समोरील महामार्गावरील सर्व्हिस रोडवर आणली आणि गाडी बंद करुन तिच्यात बिघाड झाल्याचा बहाणा केला. आईला खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर गाडीचे बॉनेट उघडून त्याने तेथे सायमनला थांबायला सांगितले. आई गाडीपासून लांब असल्याचे पाहिल्यावर पुन्हा गाडीत येऊन त्याने गाडीत ठेवलेले पेट्रोल बहिण संगीता हिच्या अंगावर व गाडीत इतरत्र फेकून लाईटरनने पेटवून दिले. त्याबरोबर गाडीने पेट घेतला. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे दाखवून त्याने हा खुनाचा प्रकार पचविण्याचा प्रयत्न केला. हिजंवडी पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात येऊन पोलीस तपास करीत होते.

दरम्यान, पोलिसांना एक निनावी पत्र मिळाले. त्यात हा अपघात नसून खून असल्याचे म्हटले होते. त्यावरुन पोलिसांनी चौकशी सुरु केली. तेव्हा जॉन हा मॅकेनिक असल्याने त्याला सीएनजी गाड्यांमध्ये शॉट सर्किटमुळे कशा आगी लागतात, हे माहिती होते. त्यामुळे त्याने ही कल्पना लढविली. तसेच विमाच्या ३० लाख रुपयांचा मोहही त्याला पडला होता.

पोलिसांनी त्याला बोलावून चौकशी केली. तेव्हा तो सुरुवातीला दाद देत नव्हता. पण पोलिसांच्या प्रश्नाच्या भडीमारापुढे त्याचा टिकाव लागला नाही. त्याने गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस निरीक्षक अजय जोगदंड अधिक तपास करीत आहेत.