Pune : हडपसरमधील दीड वर्षापुर्वीच्या खूनाचा पर्दाफाश; तपास सुरू होता एका मर्डरचा अन् गुढ उकलले दुसर्‍याचेच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   एका खून प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना दुसऱ्या एका खुनाचा सुगावा लागला आणि हडपसर येथे दीड वर्षांपूर्वी झालेल्या खुनाची उकल करता आली. त्या प्रकरणात पोलिसांनी आता एकाला अटक केली आहे.

संतोष सहदेव शिंदे (वय 27) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत नरसिंग विठलं गव्हाणे (वय 65) यांचा खून झाला होता. फुरसुंगी परिसरात 29 डिसेंबर 2019 रोजी खून प्रकरण समोर आल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर दीड वर्षांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला आले. गव्हाणे यांचा निर्घुण खून करत चेहऱ्यावर दगडा विटाने मारहाण केली होती.

दरम्यान, हडपसर येथे (दि. 7 एप्रिल) गेल्या महिन्यात पतीने पत्नीचा ती सतत माहेरी जात असल्यावरून खून केला होता. चाकूने भोसकून त्याने खून केला होता. या प्रकरणात पोलिसांनी पती असलेल्या सागर बाळू लोखंडे (वय 23) याला अटक केली होती. त्याची पत्नी शुभांगी सागर लोखंडे हिचा यात खून झाला होता.

पत्नीचा खून का केला? याच खर कारण शोधण्यासाठी पोलीस त्याच्याकडे चौकशी करत होते. यावेळी सागर व शुभांगी यांचे दुसरे लग्न झाले असल्याचे समोर आले. शुभांगी हिचा पहिला नवरा हा संतोष शिंदे हा होता. पण, तरीही पत्नी शुभांगी ही पहिला नवऱ्या सोबत बोलत असत. त्यामुळे भांडण होत. या भांडणात एकदा पत्नी शुभांगी हिने माझ्या पहिल्या नवऱ्याने यापूर्वी एक मर्डर केला आहे. तू आमच्या दोघांमध्ये आलास, तर तो तुला देखील संपून टाकेल, अशी धमकी दिली होती, अशी माहिती तपासादरम्यान सागर लोखंडे याने पोलिसांना दिली.

मग, पोलिसांनी ‘अनडीटेक्ट मर्डर’ची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी फुरसुंगीत दीड वर्षापूर्वी नरसिंग गव्हाणे या व्यक्तीचा खून झाला होता. पण या प्रकरणात आरोपी निष्पन्न झाले नसल्याचे समजले. हा खून संतोष याने केला असावा अशी शक्यता होती. पोलिसांनी यादृष्टीने तपासाला सुरुवात केली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याच्या विषयी अधिक माहिती एकत्र करून चिखलीतून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशीत केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करत खुनाचे कारण विचारण्यात आले. त्यावेळी त्याने सांगितले, जिथे नरसिंग गव्हाणे हा दारू पीत असे. त्याच ठिकाणी आपणही दारू पिण्यास जात. पण, नरसिंग गव्हाणेचे याठिकाणी येणे आवडत नसे. दरम्यान 29 डिसेंबरच्या रात्री संतोष शिंदे हा दशक्रिया विधीच्या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला. त्या ठिकाणी आधीच नरसिंग गव्हाणे बसला होता. यावेळी त्यांच्यात भांडण झाले. संतोष शिंदे याने नरसिंग याला खाली पाडून दगडाने आणि विटाने चेहऱ्यावर मारून खून केला. ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता गायकवाड, सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, दिगबंर शिंदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.