पुण्यातील ‘त्या’ उच्चभ्रू परिसरात झालेल्या खुनाचा उलघडा, 11 मिनीटात केला रिक्षाचालकाचा खेळ ‘खल्लास’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील उच्चभ्रू परिसरात झालेल्या रिक्षाचालकाच्या खुनाचा उलघडा करण्यात यश आले असून, मारहाण केल्याचा राग व सातत्याने शिवीगाळ केल्यावरून मित्रानेच खून केल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्क परिसरात अवघ्या ११ मिनीटात त्याने मित्राला संपवले.

प्रीतम उर्फ बाळू उर्फ पांग्या रघुनाथ मोरे (वय ३६, रा. तरवडे मळा, कोरेगाव पार्वâ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राहूल विनायक जगताप (वय ४७, रा. कवडे वस्ती) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

रिक्षाचालक राहूल याला दारुचे व्यसन होते. त्यामुळे तो मित्रासह कोणालाही शिवीगाळ करीत होता. दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा आठच्या सुमारास दारु पिताना राहूलने प्रीतमला शिवीगाळ केली. त्यामुळे प्रीतम रेल्वेपटरी ओलांडून घराच्या दिशेने आला. त्यापाठोपाठ राहूलला आला. राहूलने पुन्हा प्रीतमला शिवीगाळ करुन लाथ मारली. काही दिवसांपुर्वी राहूलने प्रीतमला दगड मारला होता. त्यानंतर पुन्हा लाथ मारल्या होत्या. सतत होणारी मारहाण आणि शिवीगाळ यामुळे प्रीतमच्या मनात राग होता. या रागातूनच प्रितम याने राहूलवर शस्त्राने वार केले. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. २००८ मध्ये प्रीतमविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके, कर्मचारी शिंदे, साळुंंके, सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.