पुणे : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन प्रियकरावर कोयत्याने सपासप वार करुन खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तिच्या प्रियकरावर कोयत्याने सपासप वार करुन त्याचा खुन केल्याची घटना समोर आली आहे. भोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनोज तुकाराम कदम (वय ३०, रा. भुतोंडे, भोर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, संदीप नारायण कंक (वय ३५, रा़ भुतोंडे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील भुतोंडे येथील गाड्या उंबराजवळील भैरवनाथ मंदिरासमोर पालिसांना एक मृतदेह आढळून आला होता. त्याचा तपास करीत असताना तो मनोज कदम याचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी संदीप कंक याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबुल केला. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन त्याने कदम याच्या डोक्यात, कानावर, छातीवर, गळ्यावर कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला होता. पोलीस निरीक्षक राजू मोरे अधिक तपास करीत आहेत़