Pune : 2 मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर रागात चाकूने वार करुन खून, कॅम्प परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर रागात एकावर चाकूने वारकरुन त्याचा खून केल्याची घटना लष्कर परिसरात घडली आहे.

उबेद बाबू कुरेशी (वय 28, रा. भीमपूरा गल्ली न 23, कॅम्प पुणे (रेकॉर्ड नाही) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी नबील शब्बीर बेलीम (अटकेत/रेकॉर्ड नाही) याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबजान चौकात दोघे बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले. यावेळी नबील याने उबेद याच्यावर चाकूने सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला होता. भरवर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडला. एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती लष्कर पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक भोसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्याला रुग्णालयात नेले. पण त्यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी नबील याला ताब्यात घेतले. अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.