पुणे : झोपण्याच्या जागेवरून वाद, वृद्धाने चर्मकाराच्या डोक्यात दगड घालून केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील हडपसरमध्ये झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एका ज्येष्ठ व्यक्तीने एका चर्मकाराच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना हडपसर मधील समर्थनगर मधील म्हाडा कॉलनीच्या मोकळ्या जागेत दोन दिवसांपूर्वी रात्री अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

रामदास दगडू वाघमारे (वय – 45) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक बाबूराव देवडे (वय – 76) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीराम दगडू वाघमारे (वय – 55) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रामदास वाघमारे हे हडपसर परिसरामध्ये बुट, चप्पल दुरुस्तीचे काम करत होते. ते हडपसर परिसरात दिवसभर फिरून काम करून रात्री समर्थनगर परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मोकळ्या जागेत झोपण्यासाठी येत होते. तसेच आरोपी अशोक देवडे हा देखील त्याच ठिकाणी झोपण्यासाठी जात होता. दोन दिवसांपूर्वी रात्री अकराच्या सुमारास रामदास आणि अशोक यांच्यामध्ये झोपण्याच्या जागेवरून वाद झाले.

याचा राग मनात धरून अशोक याने रामदास झोपले असताना त्यांच्या डोक्यात दगड मारून खून केला. पोलिसांनी या प्रकरणात अशोक देवडे याला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.