बहिणीशी प्रेम संबंध असल्यावरून 2 अल्पवयीन मुलांनी 18 वर्षाच्या ‘आयण’ला संपवलं, मरेपर्यंत केला चाकू हल्ला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बहिणीशी प्रेम संबंध असल्यावरून वाद झाले आणि ते पुन्हा स्वत:हून मिटवलेही ते त्याचा मुडदा पाडण्यासाठी. दोन अल्पवयीन मुलांनी त्याला गोडबोलून कॅनॉल शेजारी नेले व त्याच्यावर अचानक चाकूने हल्ला करत पोटात, मानेवर सपासप वारकरून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून पुरावा देखील नष्ट केला. खून पचल्याचा अविर्भावात असतानाच त्याची माहिती ‘डीबी’च्या पथकाला लागली आणि या खुणाला वाचा फुटली. पुण्यातील वानवडी भागात हा खून झाला असून, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

आयाण (वय 18) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयाण याला सिगारेट पिण्याची खूप सवय होती. तत्पूर्वी यातील एक अल्पवयीन मुलाच्या बहिणीसोबत त्याचे प्रेम संबंध होते. ही बाब अल्पवयीन मुलाला समजली. यावेळी त्या दोघात भांडण झाले. मात्र त्याने दोघा आरोपींसोबत हुशारीने ते वाद मिटवले. त्यानंतर त्याच्याशी बोलणे वाढवले. तसेच दोन दिवसांपूर्वी आयाण याला रिक्षातून इम्प्रेस गार्डन परिसरात सिगारेट पिण्यासाठी म्हणून आणले. त्याला सिगारेट पिण्यास दिली. त्यानंतर ते खाली बसून बोलत असतानाच दोघांनी चाकूने त्याच्यावर अचानक सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याचा जीव जाईपर्यंत त्याच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये टाकला. खूनासाठी या दोघांनी चाकू देखील नवीन घेतला होता. त्यांनी प्लॅनिंगने खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान मृतदेह कॅनॉलमध्ये टाकल्यानंतर त्या दोघांना या  खूनबद्दल कळणार नाही असे वाटले. खुनानंतर ते दोघे नाना पेठेत आले होते. मात्र आज वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील आणि उपनिरीक्षक भोसले यांना हद्दीत एक  खुन झाला असून, त्याचे आरोपी नाना पेठेत फिरत असल्याबाबत समजले. यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी हा खून समोर आला आहे.