पौड : रस्त्याच्या वादातून पुण्यात युवकाचा खून, 4 आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतातील रस्त्याच्या वादातून एका युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तव-मोसे येथे घडली. या प्रकरणातील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा डोंगरामध्ये पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

भाऊ सामा मरगळे (वय-35 रा. तव, ता. मुळशी, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश रामभाऊ मरगळे (वय 23 रा. किरकिटवाडी ता. हवेली), राजु ज्ञानोबा मरगळे (वय 19 रा. तव ता. मुळशी), विजय बाबुराव मरगळे (वय 22 रा. तव ता.मुळशी), सुनिल रामभाऊ मरगळे (वय 20 रा. तव ता.मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी आणि मयत यांच्यामध्ये शेतीतील रस्त्यावरून वाद होते. याच कारणावरून आरोपींनी मयत भाऊ मरगळे याचा शनिवारी (दि.30) सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान कोयत्याने मानेवर सपासप वार करून खून केला. खून केल्यानंतर आरोपीं फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना आरोपी किरकीटवाडी – करंजावणे वस्ती जवळील डोंगर माथ्यावर लपून बसले आहेत अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी सापळा रचून आरोपींचा पाठलाग करून आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींना पुढील तपासासाठी पौड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे ,सहायक फौजदार दत्तात्रय जगताप , पोलीस हवालदार रौफ इनामदार, मुकुंद आयचीत, पोलीस नाईक गुरू जाधव, विजय कांचन, लियाकत मुजावर पोलीस शिपाई अमोल शेडगे, मंगेश भगत, सुधीर अहिवळे, धिरज जाधव यांनी केली.