दोन गटात राडा : तडीपार गुंडाकडून सराईत गुन्हेगाराचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वर्चस्वाच्या वादातून जनता वसाहतीमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन गटामध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून झाला असून त्याचे इतर दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. तडीपार गुंड आणि त्याच्या साथीदारांनी सराईत गुन्हेगाराचा वर्दळीच्या ठिकाणी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे.

निलेश उर्फ निल्या वाडकर असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचे अन्य दोन साथीदार गंभीर जखमी असून त्यापैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निलेश वाडकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तो आरोपी होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. गेल्या काही महिन्यांपासुन तो येरवडा कारागृहात होता. नुकताच तो जामिनावर सुटला होता.

जनता वसाहतीमध्ये वर्चस्वाच्या वादातून तडीपार असलेल्या चॉकलेट सुन्या आणि निलेश वाडकर यांच्यामध्ये वाद चालु होते. गेल्या महिन्याभरापसुन त्यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. वाडकर, चॉकलेट सुन्या आणि सनी चव्हाण असे तिघांचे बर्‍यापैकी वर्चस्व जनता वसाहतीमध्ये असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चॉकलेट सुन्या आणि सनी चव्हाण यांच्यामध्ये समझोता होत होता. तसे झाले असते तर निलेश वाडकर आणि त्याचे साथीदार कमकुवत झाले असते. त्यामुळे तो चॉकलेट सुन्याच्या मागावर होता. वाडकर हा शनिवारी चॉकलेट सुन्याला शोधत गेला होता. मात्र, सुन्या त्याला मिळून आला नाही.

याबाबतची माहिती चॉकलेट सुन्या आणि त्याचा साथीदार योगेश जामले यांना मिळाली होती. त्यावेळी त्यांनी निल्या वाडकरची गेम करण्याचे ठरविले. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चॉकलेट सुन्या आणि योगेश जामले आणि इतरांनी निल्या वाडकर आणि त्याच्या इतर साथीदारांना गाठले. दोन गटामध्ये तुफान हाणामारी चालु झाली. काही वेळातच चॉकलेट सुन्या आणि त्याच्या साथीदाराने कोयता काढला आणि त्याव्दारे निलेश आणि त्याच्या इतर दोन साथीदारांवर सपासप वार केले. त्यामध्ये रक्‍तभंबाळ झालेल्या निलेशचा खून झाला तर त्याचे इतर दोन साथीदार गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

तडीपार गुंडाने सराईत गुन्हेगारचा खून करून इतर दोघांना गंभीर जखमी केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दत्‍तवाडी पोलिस आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. निलेश वाडकरच्या जखमी झालेल्या साथीदारांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जनता वसाहत आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तडीपार गुंड शहरात खुलेआम कसे फिरतात असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us