पुण्यातील हडपसरमध्ये पुन्हा एका सराईताचा दगडाने ठेचून खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील हडपसर परिसरात तीनच दिवसानंतर पुन्हा एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. त्याला दगडाने ठेचून मारण्यात आले आहे.

बसवराज उर्फ बश्या कांबळे (वय 23, रा. अष्टविनायक कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसवराज हा हडपसर पोलोसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर 72 ग्रुपचा अध्यक्ष ही असल्याचे सांगण्यात आले आहे. मध्यरात्री बसवराज याचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला असल्याचा सकाळी समोर आले. त्यावेळी हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाला असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच हडपसर येथेच सराईत गुन्हेगार शोएब शेख याचा तिघांनी वादातूनच तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून केला होता. तर आता पुन्हा सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. तर हडपसर मधील गुन्हेगारीचा उद्रेक होत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या नाकर्तेपणा आणि वचक कमी झाल्यानेच येथील कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याचे स्थानिक नागतिकानी सांगितले आहे. तर यातून पोलिसांचे अपयश देखील दिसत आहे. तर मारहाणीच्या घटना दररोज घडत आहेत. त्यातूनच नंतर या खुनाच्या घटना घडत आहेत.

दरम्यान बसवराज याच्या खुनाबाबत अद्याप आरोपींची माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.