Pune : खराडीमध्ये कुख्यात गुन्हेगाराचा सिमेंटच्या गट्टूने डोके ठेचून खून, परिसरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील खराडी भागात कुख्यात गुन्हेगाराचा सिमेंटच्या गट्टूने डोके ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खराडी भागात ही घटना घडली असून, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

शैलेश घाडगे (वय 33) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश घाडगे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान भल्या सकाळी खराडी येथील मोकळ्या मैदानालगत असणाऱ्या नैव्यद्यम हॉटेलच्या शेजारी एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यांनी ही माहिती चंदननगर पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. प्रथम त्याची ओळख पटत नव्हती. पण पोलिसाना तो शैलेश असल्याचे समजले. त्यांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आहे. हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस नेमका हा खून कोणी केला याचा तपास करत आहेत. मात्र पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.