सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलिसातील मारामारीचा Video व्हायरल; मनीष भोसलेच्या खुन प्रकरणी अनंत ओव्हाळला अटक (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हेगार आणि निवृत्त पोलिसामध्ये वाद झाल्यानंतर घडलेल्या विचित्र घटनेत गुन्हेगाराच्या मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अनंत तुळशीराम ओव्हाळ (वय 61) असे अटक केलेल्या निवृत्त पोलिसाचे नाव आहे. या घटनेत मनीष काळूराम भोसले (वय 20, रा. बोपोडी) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडी येथील आनंद नगर परिसरात मनीष राहतो. मनीष याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत. त्याला दारूचे व्यसन आहे. तर ओव्हाळ हे रेल्वे पोलीस दलातून सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. या दोघांची ओळख होती.

दरम्यान, कर्मचारी आनंदनगर परिसरात डब्बा आणण्यास गेले होते. त्यावेळी मनीष येथे होता. तो नशेत होता. यावेळी विनाकारण मनीष याने त्यांची दुचाकी अडवली व वाद घातला त्यातून दोघात मारहाण सुरू झाली. या व्हिडीओत प्रथम मनीष त्यांना बेदम मारहाण करत असताना दिसत आहे. पण, कर्मचाऱ्याने तो दारू पिला असल्याने त्याला एक चापट मारली. पण, याच वेळी मनीष अचानक खाली पडला. त्यानंतर कर्मचारी ओव्हाळ यांनी त्यांच्या छातीवर लाथा घातल्याचे दिसत आहे. त्यानुसार पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल करत या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.