Corona Lockdown : पुण्याच्या येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून जामिनावर सोडलेल्या एका गुन्हेगाराचा फुटपाथवर झोपल्यानंतर अज्ञातानी शस्त्राने सपासप वारकरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन परिसरात ही घटना घडली आहे.

मुन्ना ईश्वर चव्हाण (वय 23, रा. गेवराई, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना याच्यावर पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तो येरवडा कारागृहात होता.दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जामिनावर कैद्यांना सोडण्यात येत आहे. त्यानुसार मुन्ना याची जामिनावर चार ते पाच दिवसांपूर्वी सुटका करण्यात आली होती. तो फुटपाथवर राहत होता.

आज सकाळी काही जणांना एकजण फुटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. बंडगार्डन पोलिसांनी धाव घेऊन तपासणी केली. त्यावेळी त्याच्या खिश्यात कारागृहातून सुटल्याबाबत कागद होता, त्यावरून त्याची माहिती समोर आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्याचा खून कोणी आणि का केला याचा तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.