पुण्यातील सांगवीत महिलेच्या छेडछाडीवरुन सुरक्षा रक्षकाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  महिलेची छेड काढल्यावरून बेदम मारहाण केलेल्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू झाला. मारहाण सांगवी येथे 10 मार्च 2020 रोजी झाल्याने नवी मुंबई येथील तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दुखी नवलसिंग थापा असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र गजेंद्र थापा (22, रा. मुंब्रा कौसा, जि. ठाणे. मूळ रा. नेपाळ) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुखी याला त्याचे काका प्रकाश उर्फ अजय थापा यांनी नवी सांगवी येथील एका बंगल्यात सुरक्षा रक्षकाचे काम मिळवून दिले होते. तिथे काम करत असताना दुखी याने 10 मार्च रोजी मद्य प्राशन केले आणि तिथल्याच एका चाळीतील महिलेची छेड काढली. यावरून परिसरातील युवकांनी व बंगल्याच्या मालकाने दुखी याला चांगलाच चोप दिला होता.

मारहाणीनंतर दुखी 18 मार्च रोजी तळोजा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला. तिथे त्याने स्थानिक पोलिसांना चुकीची माहिती दिली की, तळोजा येथे त्याला 2-3 इसमांनी मारहाण केली. दुखी याच्यावर 19 मार्च रोजी मुंब्रा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केले. मात्र, त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला मुंबई मधील केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा 21 मार्च रोजी दुपारी मृत्यू झाला. याबाबत तळोजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास केला.

तळोजा पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात दुखी हा घटनेच्या दिवशी तळोजा येथे नसून तो पिंपरी चिंचवड मधील सांगवी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुढील तपासासाठी गुन्हा सांगवी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास सांगवी पोलीस करत आहेत.