पुण्यातील वानवडीत मोकळया जागेत सापडलेल्या ‘त्या’ महिलेचा खून झाल्याचं उघड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वानवडीत एका मोकळ्या जागेत सापडलेल्या त्या महिलेचा खून झाला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ही महिला कोरोनाचा रेड झोन असणाऱ्या समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहे. ती मॉर्निंग वॉकसाठी घरातून सकाळी बाहेर पडल्यानंतर परत आली नसल्याचे समोर आले आहे. तिच्या गळ्यावर वार करण्यात आले आहेत. धक्कादायक समर्थ पोलिसांनी तिची मिसिंगच दाखल करून घेतली नाही.

ज्योती दीपक कांबळे (वय 35, रा भवानी पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपक कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजेच भवानी पेठेतील एका चाळीत राहण्यास आहे. या चाळीत अनेकजणांना कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांना क्वारंटाईन करण्यात आले होते.

मात्र अश्या परिस्थितीत देखील ही महिला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाते म्हणून घराबाहेर पडली. मात्र या नंतर परत आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच मिसिंग दाखल करण्यास सांगितले. परंतु पोलीसांनी त्यांची मिसिंग घेतली गेली नाही.

या दरम्यान वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राईट फ्लॅक लाईन बंगला नं. 2 वानवडी बाजाराचे पाठीमागील बाजूस एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले होते. पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. सर्वत्र मिसिंग दाखल असणाऱ्या महिलांची शोध घेतला. पण कुठेच काही मिळाले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी या महिलेची ओळख पटविण्यास वानवडी पोलिसांना यश आले. त्यावेळी महिला समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याचे समोर आले. तिच्या नातेवाईकांना बोलवून ओळख पटविली असता ही महिला ज्योती कांबळे असल्याचे समोर आले. तसेच तिचे पती समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. पण त्यांची तक्रार घेतली गेली नाही. त्यामुळे ओळख पटविण्यास तबल एक दिवस लागला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान महिला वानवडी परिसरात कशी आली आणि तिचा खून कसा झाला आणि कोणी केला याचा अद्याप काही शोध लागलेला नाही. तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.