पुण्यातील नाना पेठेत अनैतिक संबंधातून 30 वर्षीय रेश्माचा खून, घरात मृतदेह सापडल्यानं खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील मध्यवस्थीत अनैतिक संबंधातून 30 वर्षीय महिलेचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा मृतदेह राहत्या घरात सापडला असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

रेश्मा राधेशाम शर्मा (वय 30, रा. नाना पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम समर्थ पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा कुटूंबिय मुळचे राजस्थान येथील आहे. ते नाना पेठेतील पिंपरी चौकात राहण्यास आहेत. रेश्मा या गृहीणी होत्या. पती राधेशाम यांचा केटरिंगचा व्यावसाय आहे. कामानिमित्त ते शुक्रवारी कोल्हापूर येथे गेले होते. दरम्यान, त्यांनी दिवसभर पत्नी रेश्मा यांना फोन केले. परंतु, त्या फोन उचलत नव्हत्या. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूरमधून पुण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांना घराला कुलूप दिसून आले. त्यामुळे त्यांनी याघटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी रेश्मा यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे व त्यांच्या पथकाने याठिकाणी धाव घेतली. महिलेचा खून झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. अधिक तपास सुरू असल्याचे समर्थ पोलिसांनी सांगितले.