पुण्यात पूर्ववैमनस्यातून मध्यरात्री टोळक्याकडून तरुणाचा खून !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात पूर्ववैमनस्यातून मध्यरात्री झालेल्या वादात टोळक्याने बेदम  मारहाण केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या खुनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी हल्लेखोर टोळक्याचा शोध सुरू केला आहे.

फैतरसिंग गबरसिंग टाक (वय 21, रा. वानवडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरात शिकलकरी समाजात दोन गटात गेल्या 25 वर्षांपासून वाद आहेत. दोन्ही गट गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यात घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार आहेत. दरम्यान पूर्ववैमनस्यातून फैतरसिंग याचे मध्यरात्री वाद झाले होते. त्या वादातून 5 ते 6 जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर टोळके पसार झाले. फैतरसिंग हा यात गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. त्याचा मृत्यू झाला असल्याचे परिसरात समजल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

दरम्यान यातील फिर्यादी आणि आरोपी हे घरफोडीच्या गुन्ह्यात कारागृहात होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर देखील त्यांनी त्यांचे गुन्हेगारी कृत्य थांबवली नाहीत. तर पोलिसांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यानंतरही आरोपी शांत बसले नसल्याचे दिसते. तर दुसरीकडे कोरोनाच्या निमित्ताने कारागृहातून जामीन मिळाल्यानंतर गुन्हेगार शांत बसण्यापेक्षा गुन्हेगारीच करत असल्याचे दिसत आहे. त्याचा ताण मात्र पोलीस यंत्रणेवर पडत आहे.