Pune : बिबवेवाडीत तरूणाच्या डोक्यात रॉडने मारहाण करून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरूणाच्या डोक्यात रॉडने बेदम मारहाणकरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उकडकीस आला आहे. पुण्यातील बिबवेवाडी भागात घडली आहे. पोलिसांनी दोन सख्ख्या भावांसह चार जणांना अटक केली आहे.

केशव रमेश कांबळे (वय २२, रा. आंबेगाव पठार) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जावेद उमर शेख (वय ३६) आणि अन्वर उमर शेख (वय ३७, दोघेही रा. आण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी) या भावंडासह दिपक उत्तम डाखोरे (वय २१, रा. धनकवडी), विकास दत्तात्रय कापसे (वय २२, रा. बिबवेवाडी) आणि अक्षय बापु खंडाळे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत रूपाली युवराज आवारे (वय २८, रा. झांबरे वस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुन झालेला तरुण केशव कांबळे हा रूपाली आवरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. तो पूर्वी बिबेवेवाडी येथील आण्णाभाऊ साठेनगर येथे राहण्यास होता. दोन वर्षापूर्वी त्याला जावेद आणि अन्वर या दोन सख्ख्या भावांनी मारहाण केली होती. त्यांच्या भितीमुळे केशव हा बिबवेवाडी सोडून फुरसुंगी येथे राहण्यास गेला होता. त्यानंतर अन्वर व जावेद यांनी संधीचा फायदा घेत भांडणाच्या रागातून केशवच्या डोक्यात काल रॉडने मारहाण करून त्याचा खून केला. त्याच्या खूनास दिपक, विकास आणि अक्षयही जबाबदार असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी भेट दिली. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.