Lockdown : पुण्यात तरुणाचा खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात लॉकडाऊन काळात संघमघाट परिसरात झोपलेल्या एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनाचे कारण आणि आरोपी अज्ञात आहेत. गेल्याच आठवड्यात जामिनावर आलेल्या एका कैद्याचा फुटपाथवर झोपल्यानंतर शुल्लक कारणावरून खून झाला होता.

मंगेश विष्णू कांबळे (वय 25, जुनाबाजार, बंडगार्डन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश हा काही काम करत नव्हता. तो कुटुंबासोबत येथे राहत होता. दरम्यान तो जास्त प्रमाणात घरी नसायचा. झोपत देखील बाहेर होता. दरम्यान बुधवारी रात्री तो संघमघाट पार्किंगमध्ये झोपला होता.त्यावेळी अज्ञातांनी त्याच्या डोक्यात जबर मारहाण करून त्याचा खून केला. सकाळी काही नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यांनतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

दरम्यान खून कोणी आणि का केला याबाबत मात्र अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही. परिसरात माहिती घेतली जात असून त्याचे कोणाशी वाद किंवा काही व्यवहार आहेत याबाबत चौकशी करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात देखील पुणे स्टेशन परिसरात झोपलेल्याचा खून करण्यात आला होता. तो 5 ते 6 दिवसांपूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सुटून बाहेर आला होता. 24 तासात पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्याला पकडले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून त्याचा खून केल्याचे समोर आले होते.