Pune : पत्नीचे अनैतिक संबंध जगजाहीर करेल म्हणून सख्ख्या भावाने बायको आणि तिच्या प्रियकारानं त्याला संपवलं, मुळशी तालुक्यात खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सख्खा भाऊ आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध जगजाहीर करेल या भितीने भावाने, त्याच्या पत्नीने व तिच्या प्रियकराने त्याचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, मृतदेह पुरून टाकला होता. मुळशी तालुक्यातील कुळे गावात हा प्रकार घडला आहे.

संतोष विश्वनाथ बाळेकाई (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा सख्खा भाऊ स्वामीनाथ उर्फ उमेश विश्वनाथ बाळेकाई (वय 45), अमृता उमेश बाळेकाई (वय 38), विजयकुमार नारायण राठोड (वय 40) या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेतमालक प्रसाद कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुळे गावात फार्महाऊस आहे. येथे स्वामीनाथ, त्याची पत्नी अमृता आणि विजयकुमार केअरटेकर म्हणून काम करत होते. अमृता आणि विजयकुमार यांच्यात अनैतिक संबंध होते. याची माहिती अमृताचा पती स्वामीनाथ याला देखील होती. दरम्यान मयत संतोष हे दिवाळीनिमित्त अक्कलकोटहून विश्वनाथ याच्याकडे आले होते. यावेळी त्यांना भावजयीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली. यावेळी संतोषने अमृताची समजूत काढत भावाचा संसार उघड्यावर आणू नको असे सांगितले होते. दरम्यान संतोष गावी गेल्यानंतर अनैतिक संबंध जगजाहीर करेल अशी भीती विश्वनाथ याला वाटत होती. त्यामुळे त्याने पत्नी अमृता, तिचा प्रियकर विजयकुमार यांना सोबत घेऊन संतोषला ठार मारण्याचा कट रचला. दिवाळीच्या रात्री (13 नोव्हेंबर) त्याच्या गळ्यावर कोयत्याने वारकरत गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर फार्म हाऊसच्या बाजूला खड्डा करून त्याचा मृतदेह पुरला होता. दोन दिवसांपूर्वी फिर्यादी फार्महाउसवर गेले. त्यावेळी त्यांनी संतोष न दिसून आल्याने त्यांनी आरोपींकडे चौकशी केली. तिघांनीही वेगवेगळी उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी फार्महाऊस भोवती चक्कर मारली असता एके ठिकाणी त्यांना खड्डा खणल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तिघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. अधिक तपास महिला उपनिरीक्षक रेखा दुधभाते या करीत आहेत.