Pune : कडक Lockdown मध्ये सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात खुनाचा थरार ! पूर्ववैमनस्यातून तलवार आणि कोयत्याने सपासप वार करून तरुणाचा मर्डर तर दुसरा जखमी, सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कडक लॉकडाऊनमध्ये मित्रांचा दारू पिण्यास बसण्याचा बेत सुरू असतानाच दुसऱ्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून येऊन शिवीगाळ करत तलवार आणि कोयत्याने सपासप वार करत एकाचा खून केल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात घडला आहे. रात्री ही घटना घडली असून, यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. कडक Lockdown मध्ये पुण्यात खुनाची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

शाम सोनटक्के (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर यात योगेश चव्हाण (वय 19) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश, शाम व त्यांचे काही मित्र हे रायकरमळा येथील जाधवनगर भागातील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसणार होते. तसा त्यांचा बेत सुरु होता. दरम्यान, आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वीची वाद आहेत. ते एकमेकांना ओळखतात. रात्री दारू पिण्याचा बेत सुरू असतानाच आरोपी तेथे आले. त्यांच्या हातात कोयते आणि तलवारी होत्या. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

मोन्या पोळेकर याने तुम्हाला मस्ती आली आहे का, आज तुम्हाला संपवतो, तुम्ही खुनशीने पाहता का, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, फिर्यादीवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. तर मित्र शाम याच्यावर तलवार आणि कोयत्याने सपासप वर करत त्याचा खून करण्यात आला. रात्री हा प्रकार घडल्याने परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.