Pune : सोपानबाग येथील नाला गार्डन नव्हे, ऑक्सिजन पार्क – निवृत्त कर्नल पाटील

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – भैरोबा नाल्यावर सोपानबाग येथील नाल्यालगतच्या जागेवर सांडपाण्यावर गार्डन फुलविली आहे. एक नव्हे, दोन नव्हे, चक्क शेकडो प्रकारची झाडे आणि हजारो बांबूची लागवड केली. मागिल काही महिन्यापू्र्वी लावलेला बांबू 15-20 फूट उंचीपर्यंत वाढला आहे. बांबूच्या ताटवा आणि झाडांची भाऊगर्दी पाहिल्यानंतर नाला गार्डन नाही, तर नैसर्गिक ऑक्सिजन पार्कमध्ये या परिसरातील मंडळी भल्या सकाळी आणि सायंकाळी फिरत असतात. ही किमया निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी करून दाखविली आहे.

पाटील म्हणाले की, सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ग्रीन थम्ब संस्था स्थापन केली आहे. त्या माध्यमातून समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून काम करीत आहेत. खडकवासला धरणातील गाळ काढून पाणीसाठा वाढवण्याचे काम सुरू आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, असे सांगण्यापेक्षा स्वतःच हजारो झाडांची लागवड केली आणि त्यांचे संगोपन करीत आहे. भैरोबानाला येथील सोपानबागमधील नाल्यावर पूर्वी काटेरी झुडपांची गर्दी होती. त्यामुळे या परिसरात कोणी फिरकत नव्हते. नाल्यामधून सांडपाणी वाहत होते. येथे जागा आहे, पाणी आहे, त्याचा वापर केला, तर समाजासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी लष्कर विभागाकडे पाठपुरावा करून परवानगी घेतली.

वेड्या बाभळी काढून सुरुवातीला स्वच्छता केली, त्यानंतर जमिनीची नांगरट करून तेथे वेगवेगळ्या जातीची झाडे लावली. जमिनीचा पोत चांगला असून, त्याला नाल्यातील पाणी झाडांना दिल्यामुळे झाडांची वाढ झपाट्याने होत आहे. निसर्गाने दिले आहे, त्याचा चांगल्यासाठी वापर करत असताना त्यामध्ये बदल केले. झाडांची वाढ होत असताना येथील वातावरणात मोठा बदल झाला आणि प्राणी-पक्ष्यांचा किलबिलाट वाढला, त्यामुळे काम करण्यात समाधान मिळत आहे. आज पक्षी-प्राणी मोठ्या प्रमाणावर येतात, त्यांच्या खाद्यान्नाचीही सोय केली आहे, यात मोठे समाधान वाटत आहे.

सोपानबाग येथील गार्डन नाल्यावर दीड किलोमीटर लांबीचा ट्रॅक बनविला आहे. नाल्याच्या बाजूने ट्रकवर बांबूची लागवड केली आहे. या ठिकाणी साग, वड, तुळस, बांबू, पक्ष्यांसाठी चेली, चिकू, मका, सूर्यफुल, विलायची चिंच, हागदा, बेल, आपटा, फण, पपई, गवती चहा, सुगंधी फुलांमध्ये मोगरा, जाईजुई, चमेली अशा विविध जातींच्या झाडांची लागवड केली आहे. त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

कर्नल पाटील नाला गार्डनमध्ये झाडी लावून थांबले नाहीत, तर पोपट, मोर, चिमणी पाखरांसह इतर प्राणी-पक्ष्यांच्या खाद्यान्नाची सोय केली आहे. त्यांच्यासाठी त्यांनी सूर्यफूल आणि मका लावली आहे. जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी छोटे-छोटे तलाव बांधले आहेत. देशी झाडांची लागवड करून थांबले नाहीत, तर त्या झाडांची इत्ंभूत माहिती फलक लावले आहेत. जुन्या वडाच्या झाडाला आधार म्हणून पार बांधला आहे. नाल्यामधून खळाळणाऱ्या पाण्याचा आवाज घेत पक्ष्यी-प्राणी गाणी गुणगुणताना पाहून समाधान वाटते, असे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या प्रयागा होगे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी सांगितल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

तर ऑक्सिजनची विकत घ्यावा लागणार नाही

मागिल दोन महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे कृत्रिम ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढली, त्यामुळे ही वेळ आली आहे. मात्र, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले, तर ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येणार नाही. भविष्यात पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये म्हणून पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. आता धरणामध्ये प्रचंड गाळ साचला आहे, तो स्वच्छ करण्याची गरज आहे. निसर्ग भरभरून देत असला तरी, त्याचे जतन करण्याची आवश्यकता आहे. मानवाने हव्यासापोटी डोंगराचे लचकेतोड आणि वृक्षांची वारेमाप कत्तल थांबविली पाहिजे. काँक्रिकटच्या जंगलामध्ये वृक्षराजी फुलविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे निवृत्त कर्नल पाटील यांनी सांगितले.