Pune News : नांदेड सिटी पोलिस स्टेशनसाठी 18000 चौरस फूट जागा मिळणार, 120 कर्मचारी देखील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातून विभक्त होऊन पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट होत असलेल्या नांदेड, किरकटवाडी, खडकवासला आणि नांदोशी-सणसनगर या गावांसाठी नांदेड सिटी येथे पोलीस ठाणे उभारण्यात येत आहे. नांदेड सिटी येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य पोलीस ठाण्यासाठी 18000 चौरस फुट जागा देण्यात येणार आहे. या प्रस्तावित जागेची पाहणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली.

नव्याने तयार होत असलेल्या नांदेड सिटी पोलीस ठाण्यात नांदेड, किरकटवाडी, खडकवासला व नांदोशी-सणसनगर या चार गवांसह सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धायरीचा भाग जोडण्याबाबत विचार सुरु आहे. प्रस्तावित हद्दीचा आराखडा तयार करण्याचे काम झोन तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड आणि मुख्यालयातील पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडून युद्ध पातळीवर सुरु आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नांदेड सिटी प्राधिकरणाचे व्यावस्थापकीय संचालक सतीश मगर यांच्याकडून पोलीस ठाण्याच्या प्रस्तावीत जागेबरोबरच परिसराची माहिती जाणून घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, स्वप्ना गोरे, पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, नंदकिशोर शेळके, प्रमोद वाघमारे, सिंहगड रोड पोलीस स्टेशन व वाहतूक विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

नांदेड सिटी प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी सांगितले की, 99 वर्षाच्या कराराने 18 हजार चौरस फूट जागा पोलीस ठाण्यासाठी देण्यात येणार आहे. टाऊनशिप नियोजनामध्ये पोलीस ठाणे बांधून देण्याची जबाबदारी संबंधीतांकडे असते. त्यानुसार सुसज्ज पोलीस ठाणे नांदेड सिटी प्राधिकरणाकडून बांधून देण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, शासनाकडून सदर पोलीस ठाण्यासाठी तत्वत: मंजूरी मिळाली आहे. लवकरच प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. ही जागा पोलीस ठाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे. परिसरातील नागरिकांना तातडीने आणि चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मिळून 120 च्या आसपास स्टाफ या प्रस्तावीत पोलीस ठाण्यात तैनात असेल.